सांगली : शिराळा पश्चिम भागात मुसळधार; आष्टा-दुधगावात झाडे पडली

सांगली : शिराळा पश्चिम भागात मुसळधार; आष्टा-दुधगावात झाडे पडली

सांगली; पुढारी वृत्तसेवा : आष्टा शहर, दुधगाव व परिसरात सोमवारी दुपारी वादळी वारे, ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. आष्टा-वडगाव रस्त्यावरील मोठी तीन झाडे उन्मळून पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. कोकरूड परिसरात पावसाच्या तडाख्याने घरांचे पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली. शिराळा पश्चिम भागातील चरण, मोहरे, नाठवडे, पणुंब्रे वारूण फाटा, काळुंद्रे परिसरातही वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडला.

आष्टा-वडगाव रस्त्यावर झाडे पडली

आष्टा : सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वारे, ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. जोरदार वादळी वार्‍यामुळे आष्टा-वडगाव रस्त्यावरील जाधव मळा या भागातील मोठी तीन झाडे उन्मळून रस्त्यावर पडली. तसेच विद्युत खांब वाकून विद्युत ताराही खाली पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक अर्धा ते पाऊण तास विस्कळीत झाली होती. घरातील व शेतातील विद्युत पुरवठाही खंडित झाला होता.

दुधगाव परिसरात जोरदार पाऊस

दुधगाव : येथे अचानक दुपारनंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अर्धा तास पाऊस पडला. अचानक जोरदार वारे सुटल्यामुळे दुधगाव- कवठेपिरान रोडवरील काही झाडे पडली. तसेच विद्युत तारा तुटल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती. अचानक पडलेल्या पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला.

शिराळा पश्चिम भागात मोठे नुकसान

चरण : शिराळा पश्चिम भागातील चरण, मोहरे, नाठवडे, पणुंब्रे वारूण फाटा, काळुंद्रे परिसरात सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अर्धा तास वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडला. चांदोली मुख्य रस्त्यांवरील मोहरे, नाठवडे, चरण व काळुंद्रे परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे कोसळल्याने मुख्य रस्त्यांवरील काही ठिकाणी दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.

100 वर्षांचे झाड कोसळले

चरण, मोहरे व नाठवडे येथे वादळी वार्‍यासह पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरावरील व जनावरांच्या शेडवरील पत्रे उडून गेले. काही ठिकाणी वीज खांबावर झाडे कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. चरण येथील 100 वर्षांपूर्वीचे वडाचे झाड कोसळले. त्यामुळे येथील नदीकडे जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. चरण येथील ग्रामपंचायत उपसरपंच हमीद नायकवडी यांनी तलाठी, पोलिसपाटील यांना घेऊन वादळी वार्‍याने झालेल्या घराची व जनावरांच्या शेडची पाहणी करून पंचनामे सुरू केले. पावसाने पिकांना दिलासा मिळाला आहे.

कोकरूड परिसरात पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली

कोकरूड : कोकरूडसह परिसराला आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वादळी वार्‍यासह गारांच्या वळिवाच्या पावसाने झोडपून काढले. कोकरूड फाटा येथील देशमुख फर्टिलायझर या रासायनिक खताच्या दुकानाचे छत उडून गेल्याने लाखो रुपयांचे खत पावसात भिजून नुकसान झाले आहे. कोकरूड-शेडगेवाडी रोडवर असलेल्या आईस्क्रिम पार्लरवरील छताचे पत्रे उडून गेले. कोकरूड ते चिंचोलीदरम्यानच्या मुख्य रस्त्याच्या कडेचे मोठे झाड उन्मळून रस्त्यावर पडले. वाहतूक ठप्प झाली होती. विद्युत तारांवर झाडे पडल्याने परिसरातील वीज पुरवठा उशिरापर्यंत खंडित झाला होता.

वाहतूक पूर्ववत

आष्ट्याचे अपर तहसीलदार राजशेखर लिंबारे, मंडल अधिकारी लीना पाटील, तलाठी व महसूल विभागाच्या अन्य कर्मचार्‍यांनी तातडीने जाधव मळा येथे घटनास्थळी भेट दिली. पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण प्रशासनास सूचना देऊन मदतकार्य सुरू केले. यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. महावितरणचे कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत होते.

सांगलीवर ढग

सांगलीतही आज सकाळपासून दुपारपर्यंत ढगाळ वातावरणामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारनंतर जास्तच अंधारून आले. पण, पाऊस काही आला नाही. ढग आणि पावसामुळे हवेत गारवा पसरला होता. सांगलीचे तापमान आज 37 अंश सेल्सियस होते. दरम्यान, गुरुवारी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news