नाशिक : नूतन वर्षारंभ होताच सिटीलिंकची भाडेवाढ लागू ? | पुढारी

नाशिक : नूतन वर्षारंभ होताच सिटीलिंकची भाडेवाढ लागू ?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महानगर परिवहन महामंडळाने सिटीलिंक बसच्या प्रवासी भाडेदरात सात टक्के वाढ केल्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे परवानगीसाठी सादर केला आहे. आता यासंदर्भातील निर्णय प्राधिकरणच्या बैठकीत घेतला जाणार असून, नव्या वर्षात भाडेवाढीस मंजुरी मिळाल्यास भाडेवाढ नवीन वर्षापासून लागू होईल.

महापालिकेची सिटीलिंक बससेवा तोट्यात असल्याने तोटा भरून काढण्यासाठी महानगर परिवहन महांमडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार भाडेवाढीच्या प्रस्तावास महामंडळ संचालकांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बससंदर्भात झालेल्या करारानुसार दरवर्षी पाच टक्के प्रवासी भाडेवाढ अनुज्ञेय आहे. जानेवारी २०२२ मध्ये पहिल्या टप्प्यातील पाच टक्के प्रवासी भाडेवाढ करण्यात आली होती. मात्र, गेल्या वर्षभरात डिझेल आणि सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे सिटीलिंकच्या तोट्यातही वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा पाच टक्क्यांऐवजी सात टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय महानगर परिवहन महामंडळाने घेतला आहे. या प्रस्तावाला आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी घेण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय परस्पर भाडेवाढ लागू करता येत नसल्याने सिटीलिंकने भाडेवाढीचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे परवानगीकरता सादर केला आहे. सिटीलिंकच्या शहरात जवळपास २३० बसेस धावत आहेत. यातील १८५ बसेस सीएनजीवर धावत आहेत. उर्वरित डिझेलवर धावणाऱ्या बसेस आहेत. बसेसच्या माध्यमातून उत्पन्न मिळावे, या दृष्टीने सिटीलिंकच्या प्रत्येक बसेसवर जाहिराती प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यानुसार संबंधित जाहिरातदार कंपन्या तसेच संस्थांशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा:

Back to top button