पुणे उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई: थर्टी फर्स्टच्या तोंडावर 2 कोटीचा मद्यसाठा जप्त | पुढारी

पुणे उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई: थर्टी फर्स्टच्या तोंडावर 2 कोटीचा मद्यसाठा जप्त

पुणे, पुढारी वृत्तसेवा: थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून राज्यात तस्करी केल्या जाणारा सुमारे दोन कोटी रूपयांचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाने पकडला. यावेळी सात जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या कारवाईत 2 ट्रक आणि तब्बल 2 हजारांहून अधिक दारूचे बॉक्स जप्त केले आहेत. ही कारवाई सासवड आणि तळेगाव दाभाडे परिसरात केली. या प्रकरणी रमेश कुमार झुंजराम डुड्डी, बाबुलाल त्रिलोकराम , शेखर तानाजी भोसले, अभिजित दिंगबर डोंगरे , रोहित जालिंद्र खंदारे, वीरा राम, पुनामा राम चौधरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

राज्यात 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर मद्य सेवन केले जाते. त्यासाठी गोवा राज्य निर्मित मद्याची अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर आवक केली जाते. राज्य उत्पादन शुल्क विभागाला तळेगाव दाभाडे येथील सोमाटणे फाटा तसेच सासवड विभागातील वडगाब बुद्रुक गावच्या हद्दीत पुणे – बंगरुळू महामार्गावर संशयित कंटेनर आढळले. या वाहन चालकांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यामुळे तळेगाव विभागाच्या पथकाने वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये विविध कंपन्यांचे बनावट मद्याचे 960 बॉक्स आढळून आले.

बाजारपेठेत या बॉक्सची 70 लाख 84 हजार 800 रूपये एवढी किंमत आहे. याबरोबरच बारा चाकी वाहन व मोबाईल असे मिळून एकूण 90 लाख 94 हजार 9000 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर सासवड विभागाने वडगाव बुद्रुक येथील महामार्गावर एका दहा चाकी कंटेनरवर कारवाई करीत 91 लाख 77 हजार 600 रूपयांचे 610 बॉक्स आणि चारचाकी कार असे मिळून 84 लाख 87 हजार 600 रूपये किमतीच्या मुद्देमालासह पाच आरोपींना अटक केली. एकूण 1 कोटी 75 लाख 82 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दरम्यान वाहन चालकांकडे कोणताही वाहतूक परवाना आणि कागद्पत्रे आढळून आली नाहीत. हा अवैध मद्यसाठा विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.

ही कारवाई उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाचे उपायुक्त अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अधिक्षक चरणसिंग राजपूत यांच्या देखरेखेखाली निरीक्षक दीपक सुपे, पी.सी.शेलार, एस.एम. सराफ, राजेंद्र झोळ, आर.एम. सुपेकर, भोसले, नेवसे, भरणे, अप्वार, संदीप मांडवेकर, सागर दुर्वे, तात्या शिंदे, राहूल जौजाळ, आदि अधिकारी कर्मचारी यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सासवड, तळेगाव दाभाडे विभाग करीत आहे.

Back to top button