पिंपरी : महापालिका शाळांतील 44 हजार विद्यार्थी ‘आधार’पासून वंचित | पुढारी

पिंपरी : महापालिका शाळांतील 44 हजार विद्यार्थी ‘आधार’पासून वंचित

दीपेश सुराणा : 

पिंपरी : महापालिका शाळांतील 12.67 टक्के विद्यार्थ्यांकडे अद्याप आधारकार्ड नसल्याची माहिती पुढे आली आहे. येत्या 31 तारखेपर्यंत आधार कार्ड नोंदणीसाठी मुदत देण्यात आली आहे. शाळांमध्ये आधार कार्ड नोंदणीसाठी 30 ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
महापालिका शाळांमध्ये 3 लाख 51 हजार 715 विद्यार्थी आहेत. त्यातील 3 लाख 7 हजार 177 विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी पूर्ण झालेली आहे. अद्याप 44 हजार 538 विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची नोंदणी बाकी आहे. टक्केवारीत हे प्रमाण 12.67 टक्के इतके आहे. तर, 65 हजार 325 विद्यार्थ्यांचे नाव, लिंग आणि आडनावात दुरुस्ती करणे बाकी आहे.

शालेय पोषण आहाराचा मिळणार लाभ

सरकारी आणि अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड असेल, तरच त्याला शालेय पोषण आहाराचा लाभ देण्यात येणार होता. त्यामुळे येत्या 31 डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढून ते शालेय पोषण आहाराशी लिंक करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. त्यानुसार, 1 जानेवारी 2023 पासून आधारकार्ड असणार्‍या तसेच तो विद्यार्थी या योजनेशी लिंक असल्यावरच त्याला शालेय पोषण आहाराचा लाभ मिळणार होता. तथापि, आधार कार्ड नोंदणी होईपर्यंत राज्यातील कोणत्याही विद्यार्थ्याला शालेय पोषण आहार किंवा कोणत्याही सरकारच्या योजनेपासून वंचित ठेवण्यात येणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार किंवा अन्य योजनांपासून सद्यस्थितीत तरी वंचित राहावे लागणार नाही.

‘सरल’या प्रणालीच्या माध्यमातून धान्य वाटप

विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी पूर्ण होईपर्यंत राज्य सरकारच्या सरल या प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धान्य दिले जात आहे. एखादा विद्यार्थी अनुपस्थित असेल, तर त्याच्या घरी धान्य पॅक करून पोहोचविण्यात येते. राज्यातील शाळांमध्ये आधार नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी मशीन देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, शाळांमध्ये दिव्यांग विद्यार्थी शिकत असतील तर त्यांच्या घरी जाऊन आधार नोंदणी पूर्ण करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यापूर्वीच विधिमंडळ अधिवेशनात स्पष्ट केलेले आहे.

 

विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणार्‍या योजनांमध्ये पारदर्शकता यावी, या उद्देशाने महापालिका शाळांतील 30 केंद्रांवर आधार कार्ड नोंदणी केली जात आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसतील त्यांची आधार नोंदणी केली जाईल. मात्र, ही नोंदणी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला शालेय पोषण आहार योजनेपासून वंचित ठेवले जाणार नाही.

– संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी,  प्राथमिक शिक्षण विभाग, महापालिका.

Back to top button