Harsh Mander : हर्ष मंडेरच्या ठिकाणांवर ‘ईडी’चे छापे | पुढारी

Harsh Mander : हर्ष मंडेरच्या ठिकाणांवर ‘ईडी’चे छापे

नवी दिल्ली; पुढारी वृत्‍तसेवा : Harsh Mander : माजी सनदी अधिकारी आणि कार्यकर्ता हर्ष मंडेर यांच्या दिल्‍लीतील विविध ठिकाणांवर सक्‍तवसुली संचलनालय अर्थात ईडीने गुरुवारी छापे टाकले.

हर्ष मंडेर आणि त्यांच्या पत्नीने जर्मनीला प्रयाण केल्याच्या काही तासातच ईडीने हे छापे टाकले असल्याची माहिती समोर आली आहे.

वसंत कुंज भागात असलेले निवासस्थान, महरौली येथील बालकगृह तसेच अधचिनी येथील सेंटर फॉर इक्‍विटी स्टडीज येथे सकाळी आठ वाजताच ईडीच्या पथकांनी हे छापे टाकले.

हर्ष मंडेर यांना जर्मनीतील बर्लिन येथील रॉबर्ट बॉश्‍च अ‍ॅकॅडमीची फेलोशिप मिळालेली आहे. त्याकरिता ते त्यांच्या पत्नीसह बुधवारी दुपारी जर्मनीसाठी रवाना झाले होते. याच्या काही तासातच ईडीने हे छापे टाकले आहेत.

हर्ष मंडेर यांच्याकडून चालविल्या जात असलेल्या दोन बालकगृहात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे राष्ट्रीय बालहक्‍क आयोगाने गेल्या जुलै महिन्यात दिल्‍ली उच्च न्यायालयात सांगितले होते.

यासंदर्भात संबंधित संस्था चालविणार्‍यांवर कारवाई केली जावी, अशी मागणीही आयोगाकडून करण्यात आली होती.

लहान मुलांना जंतर मंतरसह विविध आंदोलन, प्रदर्शन स्थळांवर घेऊन जाणे, कामातील इतर अनियमिततेचे कारण यासाठी आयोगाने दिले होते. सीएए तसेच एनआरसीविरोधात झालेल्या ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनस्थळी लहान मुलांना घेऊन जाण्याचा आरोप हर्ष मंडेरवर आहे.

त्यातून ऑक्टोबर 2020 मध्ये राष्ट्रीय बालहक्‍क आयोगाच्या पथकाने मंडेरच्या बालगृहावर छापे टाकले होते. हर्ष मंडेर याच्या बालगृहात प्रामुख्याने भारतात बेकायदा घुसखोरी केलेल्या रोहिंग्यांची मुले राहत आहेत.

हर्ष मंडेर यांना विदेशातून पैशाचा पुरवठा केला जात आहे का, याचाही तपास ईडीकडून सुरु आहे.

Back to top button