रॉयल चॅलेंजर बेंगलोरने ठेवलेल्या 93 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरचे सलामीवीर शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या षटकापासूनच आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला आक्रमक फलंदाजी करण्यात व्यंकटेश अय्यर आघाडीवर होता.
मात्र पॉवर प्ले संपेपर्यंत शुभमन गिलनेही आक्रमक फलंदाजी करत केकेआरचे अर्धशतक धावफलकावर लावले. त्यानंतर गिलने आपला आक्रमक धडाका कायम राखत धावांची चाळीशी पार केली. मात्र अर्धशतकाला फक्त 2 धावांची गरज असताना चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला.
गिल बाद झाल्यानंतर व्यंकटेशने त्याच षटकात चहरला तीन चौकार मारत आरसीबीचे 93 धावांचे लक्ष्य पार केले. केकेआऱने 10 व्या षटकातच विजय मिळवत आयपीएलच्या ( IPL2021 KKRvsRCB ) 14 व्या हंगामातील दुसऱ्या सत्राची धडाकेबाज सुरुवात केली. डावखुऱ्या व्यंकटेश अय्यरने 27 चेंडूत नाबाद 41 धावांची नाबाद खेळी केली.
तत्पूर्वी, आयपीएल 2021 मधील रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात ( IPL2021 KKRvsRCB ) आसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र केकेआरने आरसीबीचा डाव 92 धावात गुंडाळत हा निर्णय फोल ठरवला. केकेआरकडून वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. त्याला लोकी फर्ग्युसनने 2 विकेट घेत चांगली साथ दिली. आरसीबीकडून देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक 22 धावा केल्या.
नाणेफेक जिंकल्यानंतर सलामीला आलेल्या कर्णधार विराट कोहलीने निराशा केली. चौकार मारत दमदार सुरुवात करणाऱ्या विराटला प्रसिद्ध कृष्णाने 5 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
विराट बाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि पदार्पण करणारा श्रीकार भारत यांनी आरसीबीचा डाव सरावण्यास सुरुवात केली. मात्र पॉवर प्ले संपत असतानाच लोकी फर्ग्युसनने 22 धावा करणाऱ्या पडिक्कलला बाद केले. आरसीबीला 41 धावांवर दुसरा धक्का बसला. त्यानंतर आंद्रे रसेलने आरसीबीला अजून एक धक्का दिला. त्याने पदार्पण करणाऱ्या भारतला 16 धावांवर माघारी धाडले.
भारत बाद झाल्यानंतर आरसीबीला सावरायला स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स मैदानात आला. मात्र रसेलने त्याला एक उत्कृष्ट यॉर्कर टाकत त्याची पहिल्याच चेंडूवर दांडी गुल केली. यामुळे आरसीबीची अवस्था 2 बाद 41 वरुन 4 बाद 52 अशी झाली. एबी डिव्हिलियर्स बाद झाल्यानंतर आरसीबीची सर्व मदार ग्लेन मॅक्सवेलवर होती.
मात्र वरुण चक्रवर्तीने त्याचा 10 धावांवर त्रिफळा उडवत आरसीबीला पाचवा आणि मोठा धक्का दिला. चक्रवर्तीने पुढच्याच चेंडूवर वानिंदू हसरंगाला पायचित पकडत आरसीबीला सहावा धक्का दिला. मात्र त्याला हॅट्ट्रिक साधता आली नाही. पण, पुढच्याच षटकात त्याने सचिन बेबीला 7 धावांवर बाद करत आरसीबीला सातवा धक्का दिला.
यानंतर केकेआरने आरसीबीचा डाव 92 धावात गुंडाळला. हर्षल पटेलने 12 धावांची खेळी करत संघाला शतकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकी फर्ग्युसनने त्याला बाद केले. त्यानंतर रसेलने सिराजच्या रुपाने आपली तिसरी शिकार केली. याबरोबरच आरसीबीचा डाव 92 धावात संपुष्टात आला.