‘किस्सा कुर्सी का’ ते ‘नायक’, दाहक राजकीय वास्तवावर चित्रपटांतून भाष्य | पुढारी

‘किस्सा कुर्सी का’ ते ‘नायक’, दाहक राजकीय वास्तवावर चित्रपटांतून भाष्य

भारतात राजकारण विकसित होत गेले, तसतसे राजकीय वास्तवावर आधारित चित्रपटही तयार होऊ लागले. उत्तरोत्तर त्यांची संख्या वाढत गेली. राजकारणातील भेदक वास्तव रजतपटांवर साकारू लागल्यानंतर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली. यातील ‘किस्सा कुर्सी का’ यासारख्या चित्रपटावर तर बंदी घालण्यात आली होती. अशा स्वरूपाच्या निवडक चित्रपटांवर एक झोत.

किस्सा कुर्सी का ः अमृत नहाटा यांनी 1975 मध्ये इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्या कार्यशैलीचे वाभाडे काढणार्‍या ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. मात्र, चित्रपट परीनिरीक्षण मंडळाने त्यास मंजुरी दिली नाही. एवढेच नव्हे तर तेव्हाचे माहिती आणि प्रसारण मंत्री विद्याचरण शुक्ला यांनी आणि खुद्द संजय गांधी यांनी या चित्रपटाच्या प्रिंटस् जाळून टाकल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. जनता पक्ष केंद्रात सत्तेवर आल्यानंतर 1978 मध्ये नव्या स्वरूपात हा चित्रपट रजतपटावर झळकला होता.
आंधी : 1975 मध्ये वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन गुलजार यांनी केले होते. कमलेश्वर यांनी पटकथा लिहिलेला हा चित्रपट इंदिरा गांधी यांच्यावर बेतल्याचा आरोप तेव्हा झाला होता. त्यात महिला नेत्या आरती देवी यांची भूमिका सुचित्रा सेन यांनी केली होती. तसेच, त्यांच्या पतीची भूमिका संजीव कुमार यांनी वठवली होती.

न्यू दिल्ली टाइम्स ः रमेश शर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाने 1988 मध्ये धमाल उडवून दिली होती. संवेदनशील अभिनयामुळे शशी कपूरला या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. गाझीपूरमधील एक प्रामाणिक पत्रकार विकास पांडे याची कथा या चित्रपटात गुंफण्यात आली आहे. दिल्लीत जाऊन तो एका राजकीय हत्येचा पर्दाफाश करतो, असे त्याचे स्वरूप आहे.
मै आझाद हूँ ः अमिताभ बच्चन यांच्या अप्रतिम अभिनयाने नटलेला हा चित्रपट 1989 मध्ये प्रदर्शित झाला होता. एक सामान्य माणूस (अमिताभ बच्चन) एका पत्रकाराने (शबाना आझमीने साकारलेला) तयार केलेली काल्पनिक व्यक्तिरेखा (आझाद) धारण करतो आणि राजनगरचा लाडका नेता बनतो. त्याची लोकप्रियता एवढी वाढते की, राजकीय नेत्यांना त्याचा धोका वाटू लागतो. अखेर, लोकांबद्दलचे प्रेम सिद्ध करण्यासाठी 30 मजली इमारतीवरून उडी मारतो आणि एक महत्त्वाचा संदेश मागे सोडतो.

मद्रास कॅफे ः शुजित सरकार यांनी 2013 मध्ये तयार केलेल्या मद्रास कॅफे चित्रपटात श्रीलंकेतील वांशिक संघर्षाचा ऊहापोह करण्यात आला होता. राजीव गांधी यांची हत्या आणि या हत्येला कारणीभूत असलेल्या तामिळी वाघांच्या संघटनेचा चेहरा या चित्रपटाने समोर आणला. जॉन अब्राहमने त्यात मेजर विक्रमची भूमिका साकारली होती.

गुलाल ः अनुराग कश्यप यांनी 2009 मध्ये गुलाल या सर्वस्वी वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाची निर्मिती केली होती. राज सिंग चौधरी, के. के. मेनन, दीपक डोब्रियाल, माही गिल आणि आयेशा मोहन यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचे कथानक विद्यार्थ्यांच्या विविध स्वरूपाच्या विचारसरणींवर बेतले होते. सकस कथाबीज व अप्रतिम अभिनयामुळे समीक्षकांनी त्याचे कौतुक केले आणि 2009 लंडन चित्रपट महोत्सवात तो प्रदर्शित करण्यात आला होता.

सत्ता ः भ्रष्ट राजकीय नेत्याच्या जीवनावर प्रकाश टाकणार्‍या या चित्रपटाने 2003 मध्ये खळबळ उडवून दिली होती. यात रवीना टंडनने दिल्लीत राहणार्‍या एका मुलीची भूमिका साकारली होती. राजकारणाचा ती तिरस्कार करते आणि तरीही एका भ्रष्ट राजकारण्यासोबत तिचे लग्न होते. नंतर या नेत्याला त्याच्या दुष्कृत्यांसाठी तुरुंगात टाकले जाते. त्याचा त्रास अंतिमतः चित्रपटातील नायिकेला भोगावा लागतो. यातील भूमिकेबद्दल रवीनाला तेव्हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

रण ः राम गोपाल वर्मा यांनी 2010 मध्ये रण या राजकीय थ्रिलरची निर्मिती केली होती. अमिताभ बच्चन, मोहनीश बहल, सुदीप आणि परेश रावल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आपल्या चॅनलचा टीआरपी वाढवण्यासाठी, एका टेलिव्हिजन कंपनीच्या सीईओचा मुलगा भ्रष्ट राजकारण्याशी हातमिळवणी करून पंतप्रधानांना अडचणीत आणतो, असे या चित्रपटाचे कथानक होते.

राजनीती ः प्रकाश झा यांनी 2010 मध्ये तयार केलेल्या राजनीती चित्रपटात राजकारण किती सुडाचे असू शकते, यावर झगझगीत प्रकाश टाकण्यात आला होता. अजय देवगण, नाना पाटेकर, रणबीर कपूर, कॅटरिना कैफ, अर्जुन रामपाल, मनोज बाजपेयी आदींच्या भूमिका यात आहेत. रणबीर कपूरने समर प्रतापची भूमिका केली आहे.

नायक ः एक तडफदार पत्रकार राजकीय आसन कसे हादरवू शकतो, याचे प्रत्ययकारी चित्रण नायक चित्रपटात करण्यात आले होते. 2001 मध्ये तयार झालेला हा चित्रपट कमालीचा यशस्वी ठरला. अनिल कपूर (पत्रकार) आणि अमरिश पुरी (राजकीय नेता) यांच्यातील जुगलबंदी हेच या चित्रपटाचे मर्मस्थान ठरले. एका दिवसासाठी अनिल कपूरला मुख्यमंत्रिपद मिळते आणि एवढ्या छोट्या काळात तो भ्रष्ट व्यवस्थेच्या चिंधड्या उडवतो, हा विषय रसिकांनी तेव्हा उचलून धरला होता.

Back to top button