जगातील पहिली सर्जिकल स्ट्राईक माहिती आहे का? ही होती पहिली सर्जिकल स्ट्राईक | पुढारी

जगातील पहिली सर्जिकल स्ट्राईक माहिती आहे का? ही होती पहिली सर्जिकल स्ट्राईक

दत्तात्रय नलावडे

खडकवासला : पुण्यातील लाल महालात ठाण मांडून बसलेल्या मोगल सरदार शाहिस्तेखानावर स्वारी करून छत्रपती शिवाजी महाराज बलाढ्य मोगली फौजेला हुलकावणी देत 5 एप्रिल 1663 रोजी मध्यरात्रीला पुण्यातून थेट मोसे व कर्यात मावळाच्या हद्दीवर जर्सेश्वर महादेवाच्या डोंगरावर निधड्या छातीच्या वीर मावळ्यांसह मोठ्या शिताफीने आले. तेथून दुसर्‍या दिवशी सिंहगडावर दाखल झाले.
छत्रपती शिवरायांच्या या जगातील पहिल्या यशस्वी सर्जिकल स्ट्राईकच्या मांडवी बुद्रुक, सांगरुण ( ता. हवेली) येथील श्री जर्सेश्वर डोंगर परिसरात तसेच निगडे मोसे, ओसाडेमधील मुठा नदीच्या परिसरासह आसपासच्या प्रदेशातील पाऊलखुणा प्रथमच उजेडात आल्या आहेत.

छत्रपती शिवरायांच्या युद्धक्षेत्रात स्वतःच्या कल्पकतेने आणि अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकून शाहिस्तेखानाची खोड मोडली. हजारो सैन्यांची सुरक्षा भेदून शिवरायांनी जगातील पहिला यशस्वी सर्जिकल स्ट्राईकची नोंद केली. शिवरायांच्या या अतुलनीय शौर्याची माहिती जेधे शकावली व करीनामध्ये आहे. शिवरायांच्या अद्भुत युद्धनीतीची माहिती आहे. ती अशी, “शके 1585 चैत्र शुद्ध अष्टमी रविवारी राजश्री शिवाजी महाराज स्वामींनी खास दहा लोकांनिसी लालमहाल जाऊन शास्ताखानावर छापा घातला. सोबत कान्होजी जेधे नाईक यांचे पुत्र चांदजी जेधे होते. मारामारी जाली. तेव्हा शास्ताखानाची बोटें तुटली. मग तो पळून गेला. त्याचा लेक अब्दुलफते ठार झाला. त्यानंतर महाराज दिंडी दरवाजातून बाहेर पडून घोड्यावर स्वार होऊन जेरसाकडे (जर्सेश्वर डोंगर) निघाले. जागोजागी शिवरायांनी मावळ्यांच्या टोळ्या व करणे नगारे ठेवले होते. मोगलांना हुलकावणी देत शिवाजी महाराज मावळ्यांसह दुसरे दिवशी सिंहगडावर पोचले. शास्ताखान लालमहाल सोडून गेला.”

लालमहालातून शिवराय कर्यात मावळाकडे निघाले. त्या वेळी त्यांनी आडबाजूच्या जागी मावळ्यांना सज्ज ठेवले होते. महाराज येताच वाटेतील मावळेही महाराजांसह निघून गेले. इकडे लालमहालाच्या सभोवताली पाहरा देणार्‍या मोगलांच्या फौजा शिवरायांना पकडण्यासाठी पुण्याच्या चोहीकडे रवाना झाल्या. कात्रज घाट, हिंगणे खुर्द, हिंगणे बुद्रुक, मुठा, मुळा नदीकाठाच्या परिसरात मोगलांना हुलकावणी देण्यासाठी शिवरायांनी नगारे कर्णे ठेवले होते. त्याच्या आवाजाने मोगली फौज शिवरायांच्या मावळ्यांचा पाठलाग करीत होती. मात्र, मोगलांच्या हाती एकही मावळा सापडला नाही. ‘शिवरायांनी मोगलांना कात्रजचा घाट दाखविला’ ही शिवकालीन म्हण आजही प्रचलित आहे. शिवरायांच्या साथीला तानाजी मालुसरे, चांदजी जेधे, सर्जेराव जेधे, चिमणाजी देशपांडे आदी निधड्या छातीचे मावळे होते.

मांडवी बुद्रुक व सांगरुण गावच्या हद्दीवरील उंच डोंगरावर सांगरुण गावच्या हद्दीत स्वंयभू जर्सेश्ववर मंदिर आहे, तर पुढील परिसर मांडवी बुद्रुक गावच्या हद्दीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज लाल महालातून उत्तरेच्या दिशेने भुगावच्या डोंगरातून जर्सेश्वर महादेवाच्या मंदिरात रातोरात दाखल झाले. तेथून मांडवी बुद्रुक व सांगरुण गावच्या हद्दीतील मुठा नदीपात्रातून श्री ओसाडजाई मंदिरमार्गे निगडे मोसे, वरदाडे, मालखेडमार्गे काळूबाई मंदिरमार्गे कल्याण दरवाजातून सिंहगडावर पोहोचले. या मार्गाची शिवरायांनी दूरद़ृष्टीने, गोपनीयतेने निवड केली होती. प्रत्यक्षात छापा टाकल्यानंतर लाल महालातून नेमके कोणत्या मार्गाने जाणार, याची माहिती शिवरायांनी कोणासही दिली नाही.

जर्सेश्वर डोंगर, मांडवी बुद्रुक, सांगरुण, मांडवी खुर्द, निगडे, मोसे, ओसाडे परिसरातील शिवकालीन पायमार्ग, घोडदळाचा मार्ग ऐतिहासिक वास्तू, स्थळे मंदिरे आहेत. अनेक शिवकालीन ठेवा ब्रिटिशांनी 1879 मध्ये बांधलेल्या खडकवासला धरणात बुडाला आहे. मात्र, शिवरायांच्या सर्जिकल स्ट्राईकचा वारसा आजही या परिसरात जिवंत आहे. ओसाडेमधील शिवकालीन श्री ओसाडजाई मंदिर व मांडवी बुद्रुकमधील श्री ओसाडजाई मंदिर धरणात बुडाले. दोन्ही मंदिरांतील मूर्तींची प्रतिष्ठापना ग्रामस्थांनी दोन्ही गावच्या धरणतीरावर केली. जर्सेश्वर डोंगरावरून थेट मांडवी बुद्रुकमधून खडकवासला धरण ओलांडून सिंहगडावर जाता येते.

ऐतिहासिक ठेवा जतन व्हावा

प्रस्तावित पुणे बाह्यवळण रिंगरोड मांडवी बुद्रुकमधील ओसाडजाई मंदिर परिसरातून जाणार आहे. त्यामुळे हा शिवकालीन मार्ग नष्ट होणार आहे. हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी बाजूने रिंगरोड करण्यात यावा, अशी मागणी मांडवी बुद्रुकचे सरपंच सचिन पायगुडे व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा

Back to top button