हिंगोली : राहुल गांधींना साथ देण्यासाठी लंडन येथील डॉक्टर कुटुंबासह भारत जोडो यात्रेत सहभागी | पुढारी

हिंगोली : राहुल गांधींना साथ देण्यासाठी लंडन येथील डॉक्टर कुटुंबासह भारत जोडो यात्रेत सहभागी

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी देशाच्या कोनाकोपऱ्यातून नागरिक येत आहेत. विशेष म्हणजे एक अनिवासी भारतीय कुटुंब यात्रेत सहभागी होण्यासाठी लंडनहून आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून हे कुटुंब यात्रेत पायी चालत आहे.

मूळचे रायगड जिल्ह्यातील महाडचे असलेले डॉ. सुबोध कांबळे हे लंडनमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यांना तेथील नागरिकत्वही मिळालेले आहे. तरीही ते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी भारतात आले आहे. त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी भारुलता पटेल-कांबळे, मुलगा प्रियम कांबळे, आरुष कांबळे हेही आहेत. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे यात्रेत सहभागी झाले आहेत.

याबाबत डॉ. सुबोध कांबळे म्हणाले की, राहुल गांधी यांच्याबद्दल आदर आणि कुतुहलही आहे. सध्या देशात जे वातावरण आहे, ते पाहता राहुल गांधी यांच्या देश जोडण्याच्या प्रयत्नांना साथ देण्याचा मनापासून हा प्रयत्न आहे. इतरही अनेक मुद्दे आहेत, त्यासाठी त्यांना पाठिंबा द्यायचा आहे. त्यामुळे मी देगलूर येथून या यात्रेत सहभागी झालो. महाराष्ट्रात ही यात्रा असेपर्यंत यात सहभागी होणार आहोत. भारुलता म्हणाल्या की, आमच्या भविष्यातील पिढीसाठी हा एक मोठा संदेश आहे. आम्ही विविधतेतून एकतेचा संदेश पाळला पाहिजे. अनेक भाषा, धर्म जाती आहेत. मात्र तरीही एकत्रित राहतो. आम्ही धर्म, जातीमध्ये विभागलो नाही पाहिजे. ही यात्रा एखाद्या पक्षाची यात्रा आहे, म्हणून याकडे पाहत नसून ही यात्रा भारत जोडण्यासाठी असल्याने यामध्ये सहभागी झालो आहोत.

हेही वाचा :

Back to top button