

पुढारी ऑनलाईन डेस्क : येत्या काळात पक्षप्रवेशाचे मोठे बॉम्बस्फोट होतील, देशाचे नेते महाराष्ट्रात आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते भाजपात. यात्रा सुरु असताना नांदेड, ठण्यातही लोकांचा पक्षप्रवेश झाला आहे. ज्या काही आमच्याकडे याद्या आहे यावरुन स्पष्ट होते की २०२४ मध्ये भाजपात आणि शिंदेजीकडेही पक्षप्रवेशाचे राजकीय स्फोट प्रचंड होतील, महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता आहे, असे म्हणतं भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाविकासआघाडीवर निशाणा साधला आहे. आज ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. वाचा सविस्तर बातमी.
आज कोल्हापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, आज २५ वा जिल्हा संवादाचा आहे. आज केवळ आणि केवळ भाजपाची व्यवस्था मजबूत करणे, कार्यकर्त्यांशी संवाद साधणे हा हेतू आहे. साधारण १४ तास एका जिल्ह्यात प्रवास होतोय. यात पक्षप्रवेशाची योजनाही घेतली आहे. काल साताऱ्यात १२००० कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. भारत जोडो यात्रा सुरु आहे पण नेते भारत जोडो यात्रेत आहेत तर कार्यकर्ते हे भाजपात आहेत, असेही ते म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले उद्धव ठाकरे आता काँग्रेसचे संविधान स्वीकारायचे बाकी राहिलेत. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे विचार स्वीकारलेे आहेत. शिवसैनिक शिंदे गटात नाराज होऊन जात आहेत. यावेळी त्यांनी राष्टवादीवरही निशाणा साधला. ते म्हणाले शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांची बुद्धी भ्रष्ट केली आहे. त्यांनी सांगितले तर सांगितलं तर उद्या उद्धवजी काँग्रेसच्या डायसवर देखील बसतील. उद्धव ठाकरे यांनी आयुष्यातील मोठी चूक केली आहे. ते विचारांशी कॉम्प्रोमाइज करत आहेत. असा टोलाही त्यांनी लगावला.
काही पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. कोणी अधिवेशन सोडून जाते? तर कोणी काय करते? राज्यात काय चाललंय हे तुम्हाला माहितीच आहे. असं म्हणतं त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादी आणि अजित पवारांवर निशाणा साधला. पुढे म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस यापुढे कधीही सत्तेत येणार नाही. गजानन कीर्तीकर यांनी शिवसेना वाढवण्यासाठी संपूर्ण आयुष्य दिलं आहे. त्यांनी काल शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. मात्र, ज्यांनी विचार सोडला त्यांना या गोष्टीचा काहीच फरक पडणार नाही आहे. पुढे म्हणाले जर का उद्या बहुमत सिद्ध करायला लावलं तर आम्ही सिद्ध करू आज 164 जण आहेत उद्या 184 होतील.
प्लॅन करून लव्ह जिहाद प्रकरण वाढत आहेत. राज्यात बघितल तर हिंदू मुलींना मुस्लिम तरुण प्रेमाच्या जाळ्यात ओढत आहेत. हे 99.99 टक्के केसमध्ये फसवल्याचे दिसत आहे आणि घडत आहे. पोलिसांचा कोणताही रिपोर्ट घ्या. यात ते उघड होईल, यावर आळा घातला पाहिजे असे स्पष्टीकरण त्यांनी लव्ह जिहाद संदर्भात दिले. ज्या ठिकाणी इतिहासाला, संस्कृतीला बाधा पोहोचत आहे त्या ठिकाणी भाजप महत्त्वाची भूमिका घेईल. योग्य ती कारवाई केली जाईल. भाजप-शिंदे सरकार गड किल्ले ऐतिहासिक राहिले पाहिजेत यासाठी ठोस भूमिका घेईल. इतिहासाला बाधा पोहोचत असलेले अतिक्रमण काढण्यासाठी योग्य कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहेत यावर बावनकुळे म्हणाले, याला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. महाविकास आघाडीने काहीच निर्णय घेतले नाही. त्यामुळे तिन्हीही प्रकल्प गेले. कोरोनाला घाबरून उद्धवजी 18 महिने मंत्रालयात गेले नाहीत. लाखो रुपये गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना ते भेटत नव्हते, तर मग काय होईल? असा सवालही त्यांनी केला. या प्रकल्पासाठी वेळेत प्रस्ताव दाखल केले नाहीत. यात महाविकास आघाडी सरकारचा दोष आहे, असंही ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हरहर महादेव चित्रपट बंद पाडताना एका प्रेक्षकाला मारहाण केली म्हणून त्यांना अटक करण्यात आली. यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले, सेन्सॉर बोर्डाकडे तुम्ही तक्रार करू शकता. पण टॉकीजमध्ये जाऊन मारहाण करणं योग्य नाही. जितेंद्र आव्हाड यांचा इतिहास माहिती आहे का? कायदा सगळ्यांसाठी सारखाच आहे. त्या ठिकाणी कुणीही असो. आव्हाड यांच्यावर कारवाई केली ती. सगळे पुरावे बघून केली असेल. एखाद्या चित्रपटाबाबत आक्षेप असेल तर तो सांगण्याचा वेगळा मार्ग आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना हे खपवून घेतलं जाणार नाही, असेही ते म्हणाले.
हेही वाचा