

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण करणारा 'हर हर महादेव' हा चित्रपट बंद पाडल्याने ठाणे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी अटक केली. ही अटक एका चाणक्याच्या दबावामुळे झाल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला होता. दरम्यान, आव्हाड यांच्या अटकेनंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. इतिहासाचे विद्रुपीकरण आम्ही सहन करणार नाही, जेलची भीती काय दाखवता, फाशी द्या, प्राण गेले तरी बेहत्तर, अशा आशयाचे होल्डींग ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरात लागले आहेत.
चुकीचा इतिहास मांडणारा हर हर महादेव हा चित्रपट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात बंद पाडला. त्यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण झाली होती. त्याप्रकरणी मनसेने उडी घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेत मोफत शो लावले होते. ज्या प्रेक्षकाने मार खाल्ला होता, तो ही मनसे नेत्यांसोबत पुन्हा पिक्चर पाहण्यासाठी गेला आणि त्यानंतर त्याने केलेल्या पोलीस तक्रारीवरून वर्तकनगर पोलिसांनी आव्हाड यांच्यासह १०० जणांवर गुन्हे दाखल केले.
त्यापैकी १२ जणांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. ही अटक पोलिसांनी दबावामुळे केली असून घरचे जेवण ही मिळू नये, याकरिता प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आव्हाडांच्या नातेवाईकांनी केला आहे. मुंब्रा, कळव्यात आंदोलने झाली असून पोलीस ठाण्याबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आव्हाड यांना आज सकाळी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी देखील कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याने कोर्ट परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
सुनावणीनंतर न्यायालयाने जामीन की पोलीस कोठडी याबाबतचा निर्णय राखून ठेवल्याने आव्हाड यांना पुन्हा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर ठाणे, कळवा आणि मुंब्र्यात लागलेल्या होल्डिंग, बॅनरची चर्चा रंगली आहे. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण सहन करणार नाही, जेलची भीती काय दाखवता, फाशी द्या, प्राण गेलं तरी बेहत्तर, डॉ. जितेंद्र आव्हाड, असे नमूद केलेले आहे. यावरून हे प्रकरण आणखी तापणार असल्याचे राजकीय चित्र दिसत आहे.
हेही वाचलंत का ?