रामदास कदम यांचा शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा | पुढारी

रामदास कदम यांचा शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटात होते. तर त्यांचे पुत्र व आमदार योगेश कदम शिवसेनेचे बंडखोर नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आधीच दाखल झाले आहेत. त्यामुळे रामदास कदम यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. कदम यांनी आपला राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे.

राजीनामा पत्रात कदम यांनी म्हटले आहे की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिलेली नाही, हे मला पहायला मिळालं.
आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचे काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला व माझा मुलगा आमदार योगेश कदम याला अनेक वेळा अपमानित करण्यात आले.

विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी आपण मला अचानक मातोश्रीवर बोलवून घेतले. आणि मला आदेश दिले की, यापुढे तुमच्यावरती कोणीही कितीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोणी काही बोललं, तरी आपण मीडियासमोर अजिबात जायचे नाही. मीडियासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही, यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही.
मागील ३ वर्षापासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करत आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवर संकटे आली. त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. व महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे.

२०१९ साली आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार बनवत होतात. त्याही वेळी मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेससोबत संघर्ष केला. व हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी व काँग्रेससोबत युती करु नका, तो बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा होईल. अशी आपल्याला विनंती केली होती. पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही, याचेही दुःख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेना प्रमुख असते, तर माझ्यावर ही वेळ आली नसती. आणि म्हणून मी आज शिवसेना नेता या पदाचा राजीनामा देत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button