राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता कमी : खासदार संजय राऊत यांचा दावा | पुढारी

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता कमी : खासदार संजय राऊत यांचा दावा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या १५ दिवसांपासून दोन जणांचे मंत्रिमंडळ आहे. जगामध्ये लोकशाहीची एवढी चेष्टा कधी झाली नव्हती. एवढा मोठा गट, एवढा मोठा भाजप, एवढे मोठ बहुमत असताना मंत्रिमंडळ स्थापन का झाले नाही? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी उपस्थित केला. भविष्यातही मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता कमी आहे. अपात्रतेची टांगती तलवार असल्याने हे सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा राऊत यांनी पत्रकार परिषदेतून केला.

महाविकास आघाडीचे स्थान हे येणारा काळ ठरवेल

शिवसेना, महाविकास आघाडीची शक्ती, त्यांचे महाराष्ट्र आणि देशातील स्थान हे येणारा काळ ठरवेल. एखादा, दुसरा नेता ते ठरवू शकत नाही.देशाची जनता ते ठरवेल. जे काय बुडबुडे फुटत आहेत, हवेत उडत आहेत.ते फार काळ राहणार नाहीत,अशा शब्दात राऊत यांनी भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

आमदारांच्या अपत्रातेसंबंधी बोलतांना राऊत म्हणाले की, आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. जो कायदा, नियम आहे. त्यावरच आम्ही भरवसा ठेवून आहोत. सर्वोच्च न्यायालयात न्याय मेलेला नाही.अजूनही रामशास्त्री आहेत.याचे प्रत्यंतर भविष्यात आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचे खासदार संसदेत आपला स्वतंत्र गट तयार करेल, असा दावा भाजपने केल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांना उपरोधक टोला लगावला. ते म्‍हणाले,” उद्या जो बायडेनचा पक्षही आपल्यात सामावून घेण्यासाठी प्रयत्न केला जाईल.ब्रिटनमध्ये ऋषी सनक हे पंतप्रधान होणार आहेत. ते आमच्याच पक्षाचे आणि गटाचे आहेत असे सांगितले जाईल. या देशाच्या राजकारणाला काही अर्थ राहिला नाही. जगभरात कोणताही गट तयार झाला तरी तो आमचाच आणि आमच्यामुळेच, असे सांगितले जाईल. आता या भूमिकेतून आणि मानसिकतेतून बाहेर पडले पाहिजे”.

उद्धव ठाकरे यांचा माझ्यावर विश्वास

राऊत चौथ्यांदा राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यासंबंधी बोलतांना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा माझ्यावर विश्वास आहे.आदित्य ठाकरे लहान आहेत. परंतु, त्यांचही माझ्यावर प्रेम आहे.आता मला पॉइंटेड केले जातेय करू द्या. खासदार,आमदार गेल्याने काही फरक पडणार नाही. लाखो शिवसैनिक आमच्या पाठीशी आहेत. त्यांच्या बळावर आम्ही पुन्हा उभ राहू,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

हेही वाचा

 

 

 

Back to top button