Vice President Election : ‘एनडीए’चे उमेदवार जगदीप धनकड यांचा अर्ज दाखल | पुढारी

Vice President Election : 'एनडीए'चे उमेदवार जगदीप धनकड यांचा अर्ज दाखल

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : उपराष्ट्रपती निवडणुकीतील (Vice President Election) भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे  (एनडीए) उमेदवार जगदीप धनकड यांनी आज ( दि. १८)  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरला. या निवडणुकीत धनकड यांचा मुकाबला विरोधी आघाडीच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्याशी होणार आहे.

(Vice President Election) ६ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार असून, १९ जुलै हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. धनकड यांच्या उमेदवारी अर्ज भरतेवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासहित ‘एनडीए’तील घटक पक्षांचे अनेक नेते उपस्थित होते.

राष्ट्रपती निवडणुकीप्रमाणे उपराष्ट्रपती निवडणुकीत बिजू जनता दल आणि वायएसआर काँग्रेस या कोणत्याही आघाडीत सामील नसलेल्या पक्षांनी रालोआ उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला आहे. दोन्ही पक्षांचे नेते क्रमशः मानस मोंगराज आणि विजयसाई रेड्डी यांनी धनकड यांना पाठिंबा दिला जात असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. दुसरीकडे ‘एनडीए’तील घटक पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकचे नेते एम. थंबी दुरई यांनी धनकड यांच्या समर्थनाची घोषणा केली. प. बंगालचे राज्यपालपद भूषविलेले जगदीप धनकड हे मूळचे राजस्थानचे रहिवासी असून, ते जाट समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. राजस्थानमध्ये जाट समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button