एकनाथ शिंदे यांचा ‘तो’ प्रस्ताव शिवसेनेने फेटाळला | पुढारी

एकनाथ शिंदे यांचा ‘तो’ प्रस्ताव शिवसेनेने फेटाळला

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा आणि त्यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळून लावला आहे. शिवसेनेमध्ये असे प्रस्ताव देण्याची पद्धत नाही अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी हा प्रस्ताव अमान्य असल्याचे सांगितले. शिवसेना आमदार यांच्या झालेल्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे हे आमचे सहकारी आहेत. आम्ही देखील बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. त्यांचे काही गैरसमज असतील तर ते दूर केले जातील. मात्र शिवसेनेमध्ये प्रस्ताव देण्याची पद्धत नाही, अशा शब्दात त्यांचा समाचार घेतला.

शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची आहे. आणि आम्हाला हिंदुत्वाचे बाळकडू बाळासाहेबांकडूनच मिळाले आहे. त्यामुळे गुजरातच्या भूमीवरून आम्हाला कोणी सांगू नये, असे राऊत म्हणाले.

काही आमदारांना जबरदस्तीने गुजरातमध्ये नेण्यात आले आहे. ते बाहेर पडू इच्छित आहेत पण त्यांना बाहेर पडू दिले जात नाही. त्यांच्या जीवाला धोका आहे. गुजरात पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी त्यांना वेढ्यात ठेवले आहे. जवळपास सात आमदारांचे कुटुंबीय अशा तक्रारी करत आहेत. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने तशी तक्रार केली आहे. त्यामुळे आमदारांना सोडले नाही तर मुंबई पोलिसांना कारवाई करावी लागेल, असा इशाराही राऊत यांनी दिला.

Back to top button