एकनाथ शिंदेंचे पहिले ट्विट, म्हणाले, ‘आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी कधीही प्रतारणा करणार नाही’ | पुढारी

एकनाथ शिंदेंचे पहिले ट्विट, म्हणाले, 'आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी कधीही प्रतारणा करणार नाही'

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : बंडखोरी करुन शिवसेनेच्या २९ आमदारांसह सूरतमध्ये गेलेले मंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिले ट्विट केले आहे. ”आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,” असे एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे.

दरम्यान, बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेने मोठी कारवाई केली आहे. शिंदे यांना गटनेते पदावरुन हटविण्यात आले आहे.

बंडानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे सुरतमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार होते. मात्र, त्यांनी पहिले ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली. या ट्विटवरून उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्वाची प्रतारणा केल्याचे त्यांनी ध्वनित केले आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाऊन हिंदुत्वाशी केलेली तडजोड अमान्य असल्याचे संकेतही एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

दरम्यान, भाजपचे आमदार संजय कुटे यांनी सुरतमध्ये ली – मेरिडियन हॉटेलमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. संजय कुटे हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती आमदार आहेत.

आमदारांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना गटनेतेपदावरुन एकनाथ शिंदे यांना हटविले आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी त्यांनी आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती केली आहे. सत्ताकारणाचा पुढील खेळात पक्षाचा गटनेता हा महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना शिवसेना गटनेते पदावरून हटविण्यात आले आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या लालबागमधील आमदार चौधरी यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. अजय चौधरी यांच्या गटनेते पदाला मान्यता मिळाल्यास बहुमत चाचणीच्या वेळेस त्यांचा व्हीप शिवसेना आमदारांना लागू होऊ शकतो.

Back to top button