शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांना हृदयविकाराचा झटका! | पुढारी

शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांना हृदयविकाराचा झटका!

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांना घेऊन गुजरात गाठल्यानंतर शिवसेनेमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्या या धक्‍क्‍याने महाविकास आघाडीचे सरकारही धोक्यात आले आहे. दरम्यान, सुरतमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख होते. आज सकाळी त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर सुरत येथीलच रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे कळते. आमदार देशमुख यांचा काल कुटुंबियांशी संपर्क झाला होता. तेव्हा त्यांनी अकोल्यात येत असल्याचे सांगितले होते. मात्र, ते अद्याप परत आले नसल्याने कुटुंबियांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार गेले आहेत याची चाचपणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावर बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेचे फक्त १८ आमदार उपस्थित होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे ३७ आमदार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, शिवसेनेकडून काही आमदार आपल्या मतदारसंघात गेल्यामुळे त्यांना यायला विलंब झाल्याचे सांगण्यात आले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, हे शिवसेनेवर आलेले संकट असून तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहात. या प्रसंगात खचून जाऊ नका. सरकार पडणार नाही, नाराज आमदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते यशस्वी होतील, असा विश्वास या आमदारांना दिला. तसेच आता राज्यात राहिलेल्या आमदारांना शिवसैनिकांच्या सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे नाराज असल्याचे गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यांनी राज्यातील राजकारणात मंगळवारी मोठा राजकीय भुकंप घडवून आणला. विधानपरिषद निवडणूक पार पडताच त्यांनी थेट सुरत गाठले. आपल्या सोबत त्यांनी शिवसेनेतील इतर काही आमदारही सुरतला नेले. यात पश्चिम वऱ्हाडातील तीन आमदारांचा समावेश असल्याचे समजते आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यतील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख सुरत येथे असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याचे सूत्रांकडून समजते. उपचारासाठी देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Back to top button