किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनाने काय केले?; संभाजीराजेंचा सवाल | पुढारी

किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनाने काय केले?; संभाजीराजेंचा सवाल

रायगड; इलियास ढोकले, प्रसाद पाटील : तीन वर्षांपूर्वी रायगड प्राधिकरणाच्या निर्मितीनंतर किल्ले रायगडावरील संवर्धनाचे काम सुरू झाले. तत्पूर्वी शासनाने राज्यातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काय केले? असा परखड सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी आज किल्ले रायगडावर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४८ व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित राजदरबारातील विशेष कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

रायगड ही ऐतिहासिक जागा देशाला दिशा देणारी असल्याचे स्पष्ट करतानाच सद्यस्थितीमध्ये आपणाकडे असलेल्या रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागितल्यास तो देण्यास तयार असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी शिवप्रेमी म्हणून आपण हृदयात शिवभक्त व सहकार्यांच्या मदतीने कार्यरत राहू अशी ग्वाही दिली आहे. किल्ले रायगडावरून विचारांची दिशा दिली जाते असे नमूद करून देशाचे सर्वोच्च असलेल्या राष्ट्रपतींनीदेखील छत्रपतींसमोर नतमस्तक व्हावे हीच भावना पाच मे रोजी व्यक्त केल्याची आठवण उपस्थितांना करून दिली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४८ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तारखेनुसार आयोजित करण्यात आला आहे. राज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी लाखो शिवभक्त मावळ्यांच्या उपस्थितीत गेल्या दोन दिवसांपासून किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मर्दानी खेळ, शाहीर, पोवाडे, भजन आदींचा समावेश होता. काल सायंकाळी पाचच्या सुमारास किल्ले रायगडावर आल्यानंतर विविध कार्यक्रमात संभाजीराजे यांनी आपल्या कुटुंबासह सहकार्यांसमवेत प्रत्यक्ष सहभाग घेतला.

किल्ले रायगडावरील राजदरबारात झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळा संदर्भातील प्रमुख कार्यक्रमामध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्यासमवेत आमदार अनिकेत तटकरे, आमदार राजू पाटील, आमदार मंगेश चव्हाण, मराठी क्रांती मोर्चाचे संजीव भोर पाटील, करण भाऊ गायकर, रघुनाथ चित्रे, पाटील यशवंत गोसावी व फत्तेसिंह गायकवाड आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित शिवभक्तांसमोर बोलताना छत्रपती संभाजीराजे यांनी तीन वर्षांपूर्वी रायगड प्राधिकरणाची स्थापना होण्यापूर्वी किल्ले रायगडासह राज्यातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनाने कोणते काम केले? असा रोखठोक सवाल केला.

रायगड प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर किल्ल्याच्या संवर्धनाची कामे राज्यात प्रथमच सुरू झाली आहेत. गेल्या तीन वर्षांत किल्ले रायगडावर पूर्णपणे ऐतिहासिक पध्दतीनेच कामांची आखणी व नियोजन करून सुरू असलेली कामे आपण प्रत्यक्ष पाहू शकता, असे सांगून या कामामध्ये कोणत्याही पद्धतीची बेदखल सहन केली नसल्याचे त्यांनी सांगितले. नाणे दरवाजा, मुख्य पायरी मार्ग, शिरकाई माती समोरील पाचवे जगदीश्वर कडे जाणारा मार्ग यासह विविध मार्गांचा त्यांनी याप्रसंगी उल्लेख केला. यासाठी नाशिक येथील या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून देशात मान्यताप्राप्त असलेल्या वरुण भामरे यांचा गेल्या तीन वर्षांपासून दिवसाचे अठरा ते वीस तास कार्य करणाऱ्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख केला.

किल्ले रायगडावरील राजदरबार हे कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी नसून येथून देशाला दिशा देण्याचे काम करणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले. तर छत्रपतींनी दिलेल्या मार्गावरून चालण्याचे पवित्र कार्य शिवभक्तांनी पुढे करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी संभाजीराजे छत्रपती यांनी शिवकालीन घडलेल्या घटनांचे दाखले देत त्या काळात झालेल्या घटनांबाबत परखड मत व्यक्त करुन उपस्थितांना त्या काळाची आठवण करून दिली. देशाचे राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी पाच मे रोजी किल्ले रायगडाला भेट देऊन छत्रपती समोर नतमस्तक होताना व्यक्त केलेल्या भावना छत्रपतींनी उपस्थितांसमोर कथन केल्या.

सर्व समाजालाबरोबर घेऊन छत्रपतींनी निर्माण केलेले स्वराज्य हे आज साडेतीनशे वर्षांनंतरही आदर्श व्रत्त असून त्यांचे होणारे स्मरणरंजन आपल्याला पुढील काळात योग्य मार्गावर नेईल असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केल्याच्या भावना त्यांनी नमुद केल्या.

कोरोना महामार्गाच्या दोन वर्षांच्या काळात आलेल्या बंधनानंतर रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगड व परिसरात सुरू असलेल्या विविध कामांची त्यांनी उपस्थित शिवभक्त मावळ्यांना माहिती दिली. आगामी दोन वर्षांनी येणाऱ्या तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिनासाठी यापेक्षा अधिक संख्येने शिवभक्तांनी किल्ले रायगडावर येण्याचे आवाहन करीत सर्वांनी सुरक्षितपणे शासकीय निर्देशाचे पालन करून गडावरून उतरून आपल्या घरी जावे असे आवाहन केले.

हेही वाचलंत का? 

Back to top button