स्वाती मालीवाल मारहाणप्रकरणी विभव कुमारला न्यायालयीन कोठडी | पुढारी

स्वाती मालीवाल मारहाणप्रकरणी विभव कुमारला न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहायक विभव कुमारला दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विभव कुमारला आता २८ मे रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात १९ मे रोजी अटक झाल्यानंतर न्यायालयाने विभव कुमारला  पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी एसआयटी स्थापन

 आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना झालेल्‍या मारहाण प्रकरणाची चौकशी करण्‍यासाठी दिल्ली पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. या पथकाचे नेतृत्व अतिरिक्त डीसीपी अंजिता चिपियाला करणार आहेत. या पथकामध्‍ये तीन पोलीस निरीक्षकांचाही सहभाग आहे. एसआयटी आपला तपास अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करणार आहे.

पोलिसांनी बिभव कुमारकडून घेतली माहिती

सोमवारी संध्याकाळी दिल्ली पोलिसांचे पथक या प्रकरणातील संशीयत बिभव कुमार यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जावून घटनेची माहिती घेतली. 13 मे रोजी सकाळी काय घडले? संपूर्ण घटना जाणून घेण्यासाठी पोलिसांनी बिभवच्या उपस्थितीत घटनास्थळाची पुनरावृत्ती केली. बिभव चौकशीत फारसे सहकार्य करत नाही. तो फक्त हो किंवा नाही असे उत्तर देतो. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अटकेदरम्यान बिभवने दुसऱ्या दिवशीही पोलिसांच्या चौकशीत सहकार्य केले नाही. आपण स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याचा तो सतत नकार देत आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर तो का पळून गेला आणि त्यानेमोबाईल का फॉरमॅट केला, याचे उत्तर त्याच्याकडे नाही.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिस पथक या प्रकरणाला बळ देण्यासाठी प्रत्येक पुरावे गोळा करण्यात व्यस्त आहे. पोलिस पथकाने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित अनेक कर्मचारी आणि इतर लोकांचे जबाब नोंदवले. अजून १५ ते २० जणांचे जबाब नोंदवायचे असल्‍याचेही दिल्‍ली पोलिसांनी म्‍हटलं आहे.

हेही वाचा 

Back to top button