कल्याण : शासकीय वसतीगृहाचा स्लॅब कोसळून कर्मचारी गंभीर जखमी | पुढारी

कल्याण : शासकीय वसतीगृहाचा स्लॅब कोसळून कर्मचारी गंभीर जखमी

कल्याण; पुढारी वृत्तसेवा : कल्याणमध्ये असलेल्या मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहाच्या छताचा स्लॅब कोसळल्याने एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. यामुळे वसतीगृहाच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. याबाबत मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी या वसतीगृहाची पाहणी करत प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले असून गौरीपाडा येथे वसतीगृहाची इमारत तयार असून ती धुळखात पडून आहे. या इमारतीत हे वसतीगृह हलविण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा येथे गौरी टॉवर या इमारतीत पाचवा, सहावा आणि सातव्या मजल्यावर महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण संचालनालयाचे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह आहे. येथील पाचव्या मजल्यावरील खोलीमध्ये वसतीगृहाचा कर्मचारी रामचंद्र जाधव हे झोपले असताना त्यांच्याअंगावर छताचे स्लॅब कोसळल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

या वसतीगृहात ४५ विद्यार्थी राहत असून वसतीगृहाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. ही इमारत देखील अनेक वर्षे जुनी असून ७ मजली इमारतीची लिफ्ट देखील बंद आहे. पायी जीने चढून या विद्यार्थ्याना हे वसतीगृह गाठावे लागते. येथे असलेले बेड देखील जुने आणि गंजले असून मुलांना बेडवर आंथरण्यासाठी चादर देखील उपलब्ध नाहीत. दोन खोल्यांमध्ये तर बेडचे फक्त सांगाडे असून या दोन रूममध्ये कबुतरांनी ताबा घेत कबुतरखाना बनविला आहे.

या घटनेची माहिती मिळताच मनसेचे माजी आमदार तथा शहर अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी वसतीगृहाला भेट देत पाहाणी केली. तसेच रुग्णालयात जाऊन जखमी कर्मचाऱ्याची विचारपुस केली. भोईर आमदार असतांना त्यांनी कल्याण पश्चिमेत वसतीगृह मंजूर करून आणले. गौरीपाडा येथे वसतीगृहाची इमारत तयार असून देखील धूळखात पडली आहे. या ठिकाणी केडीएमसीचे कामगार राहत असल्याची बाब उघडकीस आली आहे. या तयार इमारतीत हे वसतीगृह स्थलांतरित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.  यावेळी मनसेचे उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी, सचिन पोपलाईतकर, उपशाखा अध्यक्ष दिनेश साळवे, मनविसे उपशहर अध्यक्ष विराज चौधरी, प्रथमेश चव्हाण, सचिन नाईक, किरण तांबे, सुमेध जाधव आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

तर याबाबत या वसतीगृहाचे गृहपाल प्रविण मढावी यांना विचारले असता, कर्मचारी झोपेत असतांना ही घटना घडली असून या जखमी कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ४५ पैकी ३५ विद्यार्थी राहण्यास असून या विद्यार्थ्यांना भिवंडी आणि उल्हासनगर येथील वसतीगृहात स्थलांतरित केले आहे. तर गौरीपाडा येथे तयार असलेल्या इमारतीचा पुढील दोन महिन्यांत ताबा मिळणार असल्याचे सांगितले.

Back to top button