Dombivli MIDC Blast: डोंबिवली मानवनिर्मित ज्वालामुखीच्या तोंडावर वसलेली नगरी | पुढारी

Dombivli MIDC Blast: डोंबिवली मानवनिर्मित ज्वालामुखीच्या तोंडावर वसलेली नगरी

बजरंग वाळुंज

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीमध्ये (Dombivli MIDC Blast) एप्रिल 2016 पासून आजतागायत आग, स्फोट व इतर अशा एकूण 18 दुर्घटना झाल्या. त्यात 21 व्यक्ती मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक माहिती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून माहिती अधिकारात समोर आली   आहे. गुरूवारी (दि. 24) एमआयडीसीच्या फेज दोनमधील अमुदान तथा  अंबर केमिकल्स कंपनीत झालेल्या रिॲक्टरच्या शक्तिशाली स्फोटात ८ जण ठार झाले. तर ६० जण गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. सरासरी वर्षाला 6 दुर्घटना डोंबिवली एमआयडीसीत होत असतात. त्यामुळे मानवनिर्मित ज्वालामुखीच्या तोंडावर वसलेल्या डोंबिवलीची ओळख स्फोटके-गॅस चेंबरचे धोकादायक शहर म्हणूनच झाली आहे.

डोंबिवली धोकादायक शहर का बनले आहे?

  • डोंबिवली एमआयडीसीत 5 अतिधोकादायक कंपन्या
  • प्रदूषणाच्या बाबतीत डोंबिवली अग्रेसर शहर
  • 2016 पासून आग, स्फोट व इतर अशा एकूण 18 दुर्घटना घडल्या
  • डोंबिवली हे स्फोटके आणि गॅस चेंबरचे  शहर बनले

या सर्व दुर्घटनाग्रस्त कंपन्यांचा विरोधात कारखाने अधिनियम 1948 व महाराष्ट्र कारखाने नियम 1963 अंतर्गत न्यायालयात खटले दाखल केले आहेत. 26 मे 2016 रोजी प्रोबेस कंपनी स्फोटानंतर तज्ज्ञ लोकांची चौकशी समिती नेमली होती. त्यांनी वर्षभरानंतर 24 जुलै 2017 रोजी शासनास अहवाल सादर केला होता. त्यात अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी कडक शिफारशी व सल्ले दिले होते. परंतु सदर अहवाल औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय (कल्याण विभाग) यांच्याकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यातील शिफारशींचा अंमलबजावणी प्रश्न अनुत्तरित आहे.

Dombivli MIDC Blast : डोंबिवली हे स्फोटके आणि गॅस चेंबरचे धोकादायक शहर

डोंबिवली एमआयडीसीत 5 अतिधोकादायक कंपन्या आहेत. तसेच प्रदूषणाचा बाबतीत डोंबिवली अग्रेसर असल्याने आता डोंबिवली हे स्फोटके आणि गॅस चेंबरचे धोकादायक शहर बनले आहे. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात अतिधोकादायक कंपन्यांचा अगदी जवळ काही महाविद्यालये, मोठ्या शाळा आणि भरगच्च लोकवस्ती आहे. एकतर महाविद्यालये आणि त्या शाळा तेथून हलविण्यात याव्यात, किंवा धोकादायक कंपन्या तरी तेथून हलविल्या गेल्या पाहिजेत. नाहीतर भविष्यात मोठी दुर्घटना होऊ शकते.

प्रोबेस कंपनीत शक्तिशाली स्फोट दुर्घटना मे महिन्यात झाल्याने तेथील जवळचा शाळेचे बरेच नुकसान झाले होते. तथापि त्या दिवशी शाळेला सुट्टी असल्याने विद्यार्थी बचावले होते. प्रोबेस स्फोट मालमत्ता नुकसान पीडितांना अद्याप शासनाकडून भरपाई मिळाली नाही आणि भविष्यात ती मिळण्याची शक्यता कमी आहे. धोकादायक कंपन्यांचा जवळ राहणाऱ्यानी हा संभाव्य धोका ओळखला पाहिजे. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार लोकप्रतिनिधी, जागरूक नागरिक इत्यादींनी पुढाकार घेऊन वेळीच पावले उचलली पाहिजेत, असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ते तथा डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी राजू नलावडे यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केले आहे.

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रामध्ये 525 औद्योगिक, तर 617 निवासी भूखंड आहेत. यातील 432 कंपन्यांची नोंदणी अधिकृत आहे. मात्र यापैकी 5 कंपन्या अतिधोकादायक असल्याची कबूली औद्योगिक सुरक्षा विभागाने माहिती अधिकारात कबूल केली आहे. फेज 1 आणि 2 मधील औचटेल प्रॉडक्ट्स लिमिटेड, गणेश पॉलीकेम लिमिटेड, घरडा केमिकल्स, मेट्रोपॉलिटीन एक्समेच लिमिटेड आणि कॉलिटी इंडस्ट्रीज या कपंन्या जरी अतिधोकादायक उत्पादन तयार करत असल्या तरी त्याचा मानवी जीविताला धोका नाही. तर विविध उत्पादनासाठी हे आवश्यक असल्याचे उद्योजक सांगत आहेत.

38 कंपन्यांविरूद्ध ठाणे दंडाधिकारी यांच्याकडे खटले दाखल

डोंबिवली औद्योगिक विभागातील वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते तथा स्थानिक आमदार राजू पाटील यांनी चिंता व्यक्त केली. डोंबिवलीच्या एमआयडीसी विभागात मागील 3 वर्षात आगीच्या 6, स्फोटाच्या 4, वायुगळती 1 आणि इतर 9 आशा 19 घटना घडल्या असून 8 जण मृत्युमुखी पडले. त्यात आता अमुदान कंपनीची भर पडली आहे. या कंपनीत झालेल्या शक्तिशाली स्फोटाने 11 निष्पापांचा बळी घेतला. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना 116 कारखान्याचे सेफ्टी ऑडिट झाले असून उर्वरित कंपन्यांना सेफ्टी ऑडिट करण्याच्या सूचना दिल्याचे सरकारकडून सांगितले. सेफ्टी परीक्षणादरम्यान सेफ्टी ऑडिट न करणाऱ्या व नियमभंग करणाऱ्या 38 कंपन्यांच्या विरूद्ध ठाणे दंडाधिकारी यांचेकडे खटले दाखल करण्यात आल्याचे उत्तरात म्हटल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.

दुर्घटनांमधील बळी…

1) निलांबर डाईंग अँड ब्लिचिंग (8 जानेवारी 2019) : स्टेंटरिंग डिपार्टमेंटमध्ये मशिनवर काम करताना पुरूषोत्तम चौधरी हा कामगार बेशुद्ध होऊन पडला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

2) प्रोबेस एंटरप्राईजेस (26 मे 2016) : ऑरगॅनिकचे डिस्टीलेशन करताना शक्तिशाली स्फोट होऊन कंपनी मालक नंदन वाकटकर, सुमित वाकटकर, स्नेहल वाकटकर यांच्यासह किशोर भोसले, सुशांत कांबळे, मयुरेश वायकुळे, एस. आर. फ्रॅगरन्स कंपनीतील विलास पोळ, हरबर्ट ब्राऊन फार्मास्युटिकल्स अँड रिसर्च लॅबमधील महेश पांडे, निलम देठे, उमेश प्रसाद सिंग यांचा मृत्यू झाला.

2) अगरवाल फॅब्रिक (12 जून 2016) : या कंपनीत स्फोट होऊन काम करताना मुन्नाराम झा या कामगाराचा मृत्यू झाला.

4) वेस्टर्न केमिकल इंडस्ट्रीज (20 ऑक्टोबर 2017) : या कंपनीत सुट्टीच्या दिवशी मेंटेनन्स काम चालू असताना इलेक्ट्रिक शॉक लागून श्याम बाळू चौधरी याचा मृत्यू झाला.

5) ऍल्यु – फिन (20 नोव्हेंबर 2017) : कंपनीत ऍल्युमिनियम पार्ट्सचे  अनोडायझिंगचे काम चालते. तेथे कॉम्प्रेसर बंद करताना एअर रिसिव्हरचा स्फोट होऊन राजेंद्र यशवंत जावळे या कामगाराचा मृत्यू झाला.

6) मेट्रोपॉलिटन एक्झिकेम (1 जानेवारी 2018) : या कंपनीत स्पेशालिटी केमिकल्स व डाईज इंटर्मिडीएट्स बनविले जाते. तेथे नियमित काम सुरू असताना रामकुमार साहू याचा मृत्यू झाला.

7) जय इंडस्ट्रियल केमिकल्स (17 जून 2018) : या कंपनीत कापडावर प्रोसेसिंग केले जाते. तेथे साफसफाईचे काम सुरू असताना थिनरशी जळत्या काडीचा संपर्क आल्याने अरूण रामअजोर चौहान याचा होरपळून मृत्यू झाला.

8) डार्टमुंड लॅबोरेटरीज (27 एप्रिल 2019) : या कंपनीत औषधी गोळ्या बनतात. तेथील एसीच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन कमलेश यादव आणि गिरीधर यादव या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही कंपनी विनापरवाना आणि नकाशे मंजूर करवून न घेता सुरू असल्याचे चौकशीदरम्यान आढळून आले.

आगीच्या दुर्घटना…

1) गोपाल प्रिंट अँड प्रोसेसर्स (1 जानेवारी 2017) : या कंपनीत कापडावर प्रोसेसिंग केले जाते. कपडा तपासणीचे काम सुरू असताना या कंपनीत अचानक आग लागली.

2) इंडो अमाईन्स (2 ऑगस्ट 2017) : या कंपनीत रासायनिक प्रक्रियेद्वारे एन – मिथाईल मार्फोलीन रसायन तयार केले जाते. तेथे सुंदर पाल हा कामगार फॉस्फोरस ऑक्सिक्लोराईड या रसायनांच्या रिकाम्या ड्रमचे झाकण उघडत असताना सदर झाकण उडून स्फोटासारखा आवाज झाला. त्यानंतर पावसाच्या पाण्याशी संपर्क आल्याने ड्रम उडून क्षतीग्रस्त झाला. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही

3) आर्च फार्मालॅब (17 सप्टेंबर 2018) : कंपनीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या एका रिऍक्टरमध्ये कॉस्टिकमिश्रीत गरम पाण्याने धुण्याचे काम सुरू होते. तेथे मोठा स्फोट होऊन मोठे नुकसान झाले. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

4) झेनिथ इंडस्ट्रीअल रबर प्रॉडक्ट्स (8 ऑक्टोबर 2018) : सदर कंपनीच्या डिसपॅच विभागात आग लागली. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

5) श्रीजी लाईफस्टाईल (13 एप्रिल 2019) : या कंपनीत कापडावर प्रोसेसिंग केले जाते. पहिल्या मजल्यावरील फल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आग लागून सर्वत्र पसरली.

6) विद्या विश्वास इंडस्ट्रीज (20 एप्रिल 2019) : या कंपनीत सोप (साबण) तयार करण्यासाठी लागणारा माल तयार केला जातो. कंपनी बंद असताना इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

7) पेरॉक्सी केमिकल कंपनी (9 सप्टेंबर 2019) : दुपारच्या सत्रात रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या रिऍक्टरमध्ये अचानक स्फोट झाल्याने 4 कामगार मृत्यूच्या दाढेतून परतले. रिऍक्टर जवळ काम करणारा सचिन देशमुख (40) हा सुपरवायझर अंगावर केमिकल उडाल्याने गंभीर जखमी झाला. एका खासगी रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत तोही माघारी फिरला.

7) मेट्रोपॉलीटन एक्झीमकेम (18 फेब्रुवारी 2020) : डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मधील मेट्रोपॉलीटन एक्झीमकेम प्रा. लि. या कंपनीला भीषण आग लागली. ही आग 24 तास धुमसत होती. या आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली.

8) शक्ती प्रोसेसिंग अँड डाईंग (18 डिसेंबर 2020) : कापडावर प्रोसेसिंग करणाऱ्या डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 1 मधील कंपनीला संध्याकाळच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांच्या कापडाचा माल भस्मसात झाला. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

9) कॅलेक्स फार्मस्यूटीकल रिसर्च सेंटर (27 जानेवारी 2021) : एमआयडीसी फेज 1 मधील ए 37/38 या ठिकाणी कॅलेक्स फार्मस्यूटीकल रिसर्च सेंटरला आग लागून करोडो रुपयांचा माल भस्मसात झाला होता. विशेष म्हणजे या दुर्घटनेत 38 संशोधक थोडक्यात बचावले.

हेही वाचा 

Back to top button