Sologamy : तिचं ठरलंय….तीच वधू, तीच वर : गुजरातमधील २४ वर्षीय तरुणी करणार स्‍वत:शीच लग्‍न! | पुढारी

Sologamy : तिचं ठरलंय....तीच वधू, तीच वर : गुजरातमधील २४ वर्षीय तरुणी करणार स्‍वत:शीच लग्‍न!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लग्‍न या शब्‍द उच्‍चाराला की, या पाठाेपाठ वधू आणि वर हे शब्‍द येतातच. ही गोष्‍ट दोघांच्‍या नवआयुष्‍याची असते;पण कोणी स्‍वत:शीच लग्‍न ( Sologamy ) करणार आहे, असं म्‍हटलं तरी नक्‍कीच तुमच्‍या भुवयां उंचावतील. मात्र तसं घडतंय. गुजरातमधील २४ वर्षीय तरुणी स्‍वत:शीच लग्‍न करणार आहे. हा विवाह सोहळा ११ जून रोजी होणार आहे. गुजरातमधील किंवा किंबहुना देशातील हे पहिलं ‘स्‍व-लग्‍न’ आहे, असा तिने म्‍हटलं आहे.

क्षमा बिंदू ही २४ वर्षीय तरुणी ‘स्‍व-लग्‍न’ करत स्‍वत:शी एकरुप होणार आहे. विशेष म्‍हणजे, सर्वसाधारण लग्‍नात होणारे सर्व विधी या लग्‍न साेहळ्यात पूर्ण केले जातील. फक्‍त वरात निघणार नाही.

Sologamy : नववधू होणे हे माझं स्‍वप्‍न

या अनोख्‍या लग्‍नाबाबत क्षमा बिंदू हिने ‘टाईम्‍स ऑफ इंडिया’शी बाेलताना सांगितले की, “मला कधीच लग्‍न करायचे नव्‍हते; परंतू नववधू होणे हे माझं स्‍वप्‍न होतं. त्‍यामुळे मी स्‍वत:शीच लग्‍न करण्‍याचा निर्णय घेतला. देशात यापूर्वी असं कोणी केलं आहे का? याचा मी गुगलवर शोध घेतला;पण मला  तरी कोणीही स्‍वत:शीच लग्‍न केल्‍याचे उदाहरण आढळलं नाही. मी या देशातील स्‍वत:च्‍या प्रेमात पडून स्‍वत:शीच लग्‍न करणारी एकमेव तरुणी असेन.”

Sologamy : तुम्‍ही स्‍वत:ला आहे तसे स्‍वीकारा

‘स्‍व-लग्‍न’ म्‍हणजे स्‍वत:वर विनाअट प्रेम करणे. तुम्‍ही स्‍वत:ला आहे तसे स्‍वीकारणे आहे. भिन्‍न व्‍यक्‍तींवर प्रेम करुन लग्‍न केले जाते. मी स्‍वत:च्‍याच प्रेमात पडली असल्‍याने मी माझ्‍याशी लग्‍न करत आहे, असेही क्षमाने स्‍पष्‍ट केले आहे.

काही जणांना वाटेल स्‍व-लग्‍न ही संकल्‍पनाच असंबद्‍ध आणि मुर्खाची आहे;पण मला वाटतं की, कोणाशी लग्‍न करावे याचा अधिकार महिलांना असावा. यासाठी मी सर्वांना याची माहिती देत आहे. मला माझ्‍या आई-वडिलांचा मला पूर्ण पाठिंबा आहे. ते खुल्‍या विचाराचे आहेत. त्‍यांच्‍या मला आशीर्वाद आहे, असेही क्षमाने म्‍हटलं आहे.

क्षमाचे स्‍वत:शी होणारे लग्‍न हे गोत्री मंदिरात होणार आहे. आता सर्वांचा कडेलोट म्‍हणजे तिने हनिमूनसाठी गोव्‍याला जाण्‍याचे नियोजन केले आहे. आता एवढं विचारु नका की, स्‍वत:शी लग्‍न केल्‍याबरोबर हनीमुनला कसे जाणार? कारण या प्रश्‍नाचे उत्तर केवळ क्षमाकडेच आहे.

हेही वाचा 

 

 

 

 

Back to top button