83 कोटी वर्षांपूर्वीच्या मिठातून जीवसृष्टीचे संकेत | पुढारी

83 कोटी वर्षांपूर्वीच्या मिठातून जीवसृष्टीचे संकेत

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी 83 कोटी वर्षांपूर्वीच्या एका स्फटिकात जीवसृष्टीचे रहस्य शोधले आहेत. या स्फटिकाला ‘हॅलाईट’ असे म्हटले जाते. सैंधव मिठासारखेच (रॉक सॉल्ट) हे स्फटिक असते. मिठाच्या या स्फटिकात अतिशय प्राचीन काळातील द्रवात चांगल्याप्रकारे संरक्षित घन जैविक पदार्थ सापडले आहेत. या स्फटिकाचा शोध घेणार्‍या संशोधकाच्या मते, मिठात आढळलेले घटक प्रोकॅरियोटस् आणि शैवालाच्या पेशींसारखे दिसतात. त्यामध्ये आजही काही सूक्ष्म जीव जिवंत असू शकतात असे संशोधकांना वाटते. त्यापासून पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या उत्पत्तीचे रहस्य शोधता येऊ शकेल.

या क्रिस्टलचा शोध याचवर्षी 11 मे रोजी लागला होता. आता वैज्ञानिकांनी त्याचे अधिक संशोधन केले असून जियोलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिकेचे संशोधक आता त्याचे पृथ्थःकरण करणार आहेत. या मिठाच्या कणात काय दडलेले आहे हे त्यामधून स्पष्ट होईल. त्याच्यामध्ये अजूनही जीवन आहे की नाही हेही दिसेल. हे ‘सूक्ष्म जीव’ स्फटिकातील द्रवपदार्थामध्ये असलेल्या बुडबुड्यांमध्ये आढळले होते. त्यांना ‘फ्ल्यूड इन्क्लूजन’ या नावाने ओळखले जाते. हे छोटे बुडबुडे सूक्ष्म जीवांच्या कॉलनीसारखे किंवा निवासासारखेच असतात. वेस्ट व्हर्जिनिया विद्यापीठातील कॅथी बेनिसन यांनी सांगितले की या स्फटिकाच्या संशोधनातून बरीच अज्ञात माहिती समोर येऊ शकते. काही वैज्ञानिकांचे अनुमान आहे की या ब—ाऊन फॉर्मेशनच्या हॅलाईटमधील जैविक संयुगे ही निष्क्रिय अवस्थेत आहेत. मात्र, ती जिवंतही असू शकतात असे म्हटले जाते.

Back to top button