मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस | पुढारी

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस

पुढारी ऑनलाईन : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आली आहे. कालच (दि.१) काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना एडीची नोटीस आल्याने राजकीय चर्चांना ऊत आला होता.

पुणे येथील भोसरी एमआयडीसी भूखंड खरेदी गैर व्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास करत असलेल्या सक्तवसुली संचालनालयाने याआधी एकनाथ खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील तब्बल 5 कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त केली होती.

फडणवीस सरकारच्या काळात एकनाथ खडसे हे महसूल मंत्री असताना 2016 मध्ये त्यांनी पुण्यातील भोसरी एमआयडीसी येथे 3.1 एकर प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला. यात 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना म्हणजे रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता. परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना खडसे यांनी 12 एप्रिल 2016 रोजी बैठक बोलावली.

जमीन उकानींना परत द्यावी की, त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिल्याचा दावा केला जातो. पुढे उकानी यांनी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांना भूखंड विक्री केल्याचे समोर आले होते.

Back to top button