पुणे : दागिने लंपास करणारी टोळी जेरबंद ; तीन महिलांसह एकाला अटक | पुढारी

पुणे : दागिने लंपास करणारी टोळी जेरबंद ; तीन महिलांसह एकाला अटक

आळेफाटा (पुणे), पुढारी वृत्तसेवा : आळेफाटा बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या अंगावरील मौल्यवान दागिने हातचलाखीने पळविण्याचे काम महिला करीत होत्‍या. यातील नंदा संजय सकट (वय ३५), परिघा नाना राखपसरे (वय ६०), शोभा प्रताप खंदारे (वय ५५) आणि संजय भानुदास सकट (वय ४६, सर्व रा. इंदिरानगर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) यांना आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आळेफाटा बसस्थानक परिसरात १८ एप्रिल २०२२ रोजी बसमध्ये चढत असताना प्रवासी महिलेच्या पर्समध्ये असलेले ५० हजार रुपये व १४ तोळे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असे एकूण ७ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता.

दरम्यान, बसस्‍थानकातील सीसीटीव्हीमध्ये गाडी (क्र.एमएच १७ व्ही ३९१) कारमधील तीन महिला व एक पुरुष यांच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या. पोलिस पथकाने श्रीरामपूर येथे वेशांतर करून १८ एप्रिल ते १९ मे या कालावधीत कारबाबत सर्व माहिती मिळवली.

आरोपी १९ मे रोजी गणेश चतुर्थी असल्याने राजूर (जि. जालना) येथे गणपती मंदिर परिसरात चोरी करण्यासाठी जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या कारचा १२५ किलोमीटर पाठलाग करीत औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुंज येथे त्यांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी आळेफाटा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बस्थानक परिसरात केलेल्या सहा चोऱ्या, एक घरफोडी, एक माेठी चोरी, असे आठ गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच आरोपीकडून २४ तोळे सोने, १५ तोळे चांदी, एक कार असा १७ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याकडील चोरीचे सोने विकत घेणाऱ्या विकास सुरेश कपिले (वय ३४, रा. सलबतपूर, ता. नेवासा, जि. अहमदनगर) तसेच जगदीश गजानन देवळालीकर (वय ४०, रा. रामचंद्र कुंज, अहमदनगर शहर) या सराफाला अटक केली आहे.

हेही वाचा  

Back to top button