पुणे : तिहेरी तलाक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश | पुढारी

पुणे : तिहेरी तलाक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

पुणे,  पुढारी वृत्तसेवा : पत्नीची व मुलीची जबाबदारी न घेता पत्नीला तोंडी तिहेरी तलाक देऊन पळून जाणार्‍या पतीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कौटुंबिक हिंसाचार, अपहार, मारहाण करणे, धमकावणे तसेच मुस्लीम वुमन अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश कॅन्टोन्मेट न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. डी. पाटील यांनी पोलिसांना दिले आहेत.

याबाबत एका २२ वर्षीय विवाहितेने आपले पती आकीब शेख (३२ रा. कोंढवा) व सासरच्यांविरोधात अ‍ॅड. साजीद शाह यांच्यामार्फत धाव घेतली होती. डिसेंबर २०१६ मध्ये दोघांचे लग्न झाले होते. लग्न होण्यापूर्वी सासरच्यांनी स्थावर मालमत्तेबद्दल जे सांगितले होते, तसे सत्यपरिस्थितीत काहीही नव्हते. तक्रारदार महिलेचा व तिच्या मुलीचा खर्चही तिचे आई वडीलच उचलत होते. सासरचे तिला माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावत होते. तिला मारहाण, शिवीगाळ करण्याचाही प्रकार सुरूच होता.

याच दरम्यान तक्रारदार महिलेला कामावर जाण्यासाठीही दबाव टाकला गेला. सासरच्यांनी तिच्या पतीला तिला तलाक देण्यास सांगितले. त्यावर तक्रादाराने त्यांना तुम्ही पतीला तलाक देण्यास सांगू नका नाहीतर पोलीस तुम्हाला अटक करतील असे सांगितले. एके दिवशी पतीने तिला तोंडी तिहेरी तलाक देऊन तो पळून गेला. यामुळे त्यांच्यावर व सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी अ‍ॅड. साजीद शाह यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला. त्यावर न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button