निवडणुकीचा बदलता रंग

निवडणुकीचा बदलता रंग

[author title="प्रकाश पवार" image="http://"][/author]

उत्तर भारतात लोकसभेच्या 180 जागा आहेत. उत्तर प्रदेश हे लोकसभेचे हृदय मानले जाते. तसेच हिंदी पट्टा हाच सत्तेच्या चाव्या कोणत्या पक्षाला द्याव्यात हे ठरवतो. यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, काश्मीर या राज्यांमधील स्विंगची कथा भाजप आणि विरोधकांसाठी जास्त महत्त्वपूर्ण ठरते.

लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत. म्हणजेच जवळपास सत्तर टक्के निवडणूक पूर्ण झाली आहे.(543 पैकी 380 जागा). केवळ तीस टक्के मतदान शिल्लक राहिले आहे. तीस टक्के जागांवर (163 जागांवर) पुढील तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजप अत्यंत दमदार पद्धतीने लढली. परंतु एकपासून चारपर्यंतचे मतदानाचे टप्पे पुढे सरकले तसतसा निवडणुकीच्या उसळीची (स्विंगची) दिशाही बदलत गेली. निवडणूक जाहीर झाली, तेव्हा स्विंगच्या नाडीवर भाजपचे नियंत्रण होते. यानंतर दोन आघाडीतील तुल्यबळ स्पर्धेकडे स्विंगची दिशा वळली. ही स्विंगची कथा निवडणुकीला एका निर्णायक टप्प्यावर घेऊन गेली आहे. बहुमताच्या संदर्भात एनडीए आणि इंडिया या दोन्हीही आघाड्यांसाठी स्विंगची कथा ही चित्रकथा झालेली दिसते. ही कथा नीट समजून घेतली पाहिजे.

भाजपच्या स्विंगचे कथन

भाजपने सकारात्मक स्विंगपासून निवडणुकीला सुरुवात केली. कारण भाजपने निवडणूक लढविण्याचे एक चैतन्य पक्षामध्ये निर्माण केले. उदा. भाजपने 2019 च्या निवडणुकीपासून 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे; तर काही विश्लेषक भाजपने 2014 पासूनच 2024 ची तयारी केली होती, असेही कथन मांडत होते. याबरोबरच येथून पुढे 50 वर्षे भाजप नवभारत घडवेल, अशी ही संकल्पना मांडली जात होती. या सर्व चर्चा विश्वात भाजप मोठी उसळी (स्विंग) मारणार हाच मुद्दा विकसित झाला. यामुळे पुढील तीन गोष्टी घडल्या.

लोकसभा निवडणूक जाहीर होण्याअगोदर भाजपने स्विंगचा मोठा गवगवा केला. कारण भाजपच्या जागा शंभरहून जास्त वाढतील, अशी त्यांची अटकळ होती. म्हणजेच तीनशेच्या घरातील भाजप चारशेचा उंबरठा ओलांडून पुढे जाईल हा त्यांच्या स्विंगचा एक अर्थ होता. यास त्यांनी चारसौ पार या घोषवाक्यात रूपांतरित केले. या घोषवाक्याला माध्यमाने प्रसिद्धी दिली. यामुळे आरंभीच्या स्विंगचा अर्थ हा शंभरहून जास्त जागा वाढतील हा होता.

या स्विंगच्या कथनाला (नेटिव्हला) मुख्यतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, भाजपच्या अजेंड्यावरील प्रश्नांची सोडवणूक (370 कलम व राम मंदिर इत्यादी), भ्रष्टाचारमुक्त भारताची संकल्पना (दोन मुख्यमंत्र्यांना अटक), नव्याने एनडीएची पुनर्रचना, हिंदी भाषिक प्रदेशातील भाजपचे यश इत्यादी गोष्टींचा भक्कम आधार होता. यामुळे एका अर्थाने भारतीय राजकारणाच्या पब्लिक स्पेअरमध्ये भाजप स्विंग करणार अशीच चर्चा रंगली.

यामध्ये दुसरी भर म्हणजे इंडिया आघाडीच्या स्थापनेमध्ये नितीश कुमार यांचा पुढाकार होता. त्यांनी इंडिया आघाडी सोडली. तसेच इंडिया आघाडीतील ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीपासून अलिप्त राहून निवडणूक व्यूहरचना आखली. यामुळे भाजप वरच्या दिशेने स्विंग करणार याबद्दलची धामधूम राजकीय क्षितिजावर दिसू लागली. तर याउलट इंडिया आघाडीचा खालच्या दिशेने स्विंग सुरू आहे, असेही कथन जवळपास जनमानसामध्ये पक्के झाले होते. त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये अबोल प्रकारची सामसूम होती.

निवडणुकीचे एकूण सात टप्पे जाहीर झाले. त्यामुळे प्रचारासाठी नैसर्गिक फायदा भाजपला मिळेल, अशी ही अटकळ होती. त्यामुळे यामध्ये देखील भाजप सकारात्मक स्विंग करेल अशीच धारणा होती.

स्विंगच्या कथनातील फेरबदल

जानेवारीच्या सुरुवातीला स्विंगवरती भाजपचे पूर्ण नियंत्रण होते. परंतु फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून स्विंगमध्ये बदल झाला. केवळ सहा आठवड्यांमध्ये निवडणुकीच्या स्विंगमध्ये बदल घडून आला. या बदलाची कारणे निवडणुकीच्या स्पर्धेमध्ये दडलेली आहेत. तीन प्रकारची स्पर्धा लोकसभा निवडणुकीत आकाराला आली आहे. काँग्रेस विरोधी भाजप अशी स्पर्धा हा पहिला प्रकार. काँग्रेस स्पर्धेत नव्हती. परंतु काँग्रेस कर्नाटक, तेलंगणा येथे भाजपशी तुल्यबळ स्पर्धा करू लागली. याबरोबरच राजस्थान, मध्य प्रदेश येथे देखील काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या. दुसरे कारण म्हणजे एनडीए विरोधी इंडिया स्पर्धा उभी राहिली.

एनडीएमधील चंद्राबाबू नायडू भाजपला स्विंग करण्यासाठी मदत करत आहेत. आंध्र प्रदेशमध्ये एनडीएला सकारात्मक स्विंग मिळण्याची जास्त शक्यता आहे. एनडीएमधील नितीश कुमार, देवेगौडा, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे एनडीएचा स्विंग फार वर जात नाही. यामुळे एनडीएच्या स्विंगला बिहार आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये मोठा धक्का बसला, असे दिसते. भाजपने चारशे पारचा स्विंग घोषित केला होता. तेव्हा नॉर्थ ईस्टमधून राहुल गांधी बिहारमध्ये आले होते.

बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या काही आशा जिवंत ठेवल्या होत्या. पूर्वेकडील बिहारपासून पश्चिमेकडील महाराष्ट्रातील मुंबईपर्यंत इंडिया आघाडीची उमेद थोडीफार वाढली होती. परंतु तोपर्यंत भ्रष्टाचारमुक्त भारत या कल्पनेने दोन मुख्यमंत्री अडचणीत आले होते. यामुळे स्विंगचा काटा भाजपकडे वळणार की विरोधी पक्षांकडे वळणार याबाबत प्रचंड अनिश्चितता निर्माण झाली. 2019 मध्ये बिहार आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये मिळून 88 पैकी 80 जागा एनडीएने जिंकल्या होत्या.

या दोन राज्यांमधील स्विंगमध्ये इंडिया आघाडीने स्थानिक प्रश्नांच्या आधारे मोठा फेरबदल घडवला (आरक्षण, स्वाभिमान, भारतीय राज्यघटना). या दोन्ही राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्विंगमध्ये मोठा फेरबदल होऊ नये यासाठी प्रचार दौरे केले. त्यांनी या दोन्ही राज्यांमध्ये दौरे आणि रॅली करून स्विंग भाजपच्या विरोधात जाऊ नये याची काळजी घेतलेली. परंतु उद्धव ठाकरे, शरद पवार, लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव या चार नेत्यांनी स्विंगचे मुख्य कथानक या दोन राज्यांतील त्यांच्या बाजूने सकारात्मक वळवले. याचा प्रत्यक्ष निवडणूक निकालावर काय परिणाम होतो, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

काऊ बेल्ट (गौपट्टा) आणि स्विंग

उत्तर भारतात 180 जागा आहेत. भारतीय लोकसभेचा रस्ता उत्तर प्रदेशातून जातो. उत्तर प्रदेश हे लोकसभेचे हृदय मानले जाते. तसेच हिंदी पट्टा किंवा गौपट्टा हाच सत्तेच्या चाव्या कोणत्या पक्षाला द्याव्यात हे ठरवतो. यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, काश्मीर या राज्यांमधील स्विंगची कथा भाजप आणि विरोधकांसाठी जास्त महत्त्वपूर्ण ठरते. भाजपने उत्तर प्रदेशात 80 पैकी 64 जागा गेल्या निवडणुकीत जिंकल्या होत्या. हा त्यांचा मुख्य स्विंग होता. या निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांनी आघाडी केली आहे. त्यांनी यादव, मुस्लिम, दलित आणि अतिमागास असे नवीन सामाजिक समीकरण मांडले आहे.

इंडिया आघाडीने बिहार आणि महाराष्ट्रनंतर दुसरे आव्हान भाजपच्या स्विंगपुढे उत्तर प्रदेशात उभे केले आहे. गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये भाजप गेल्या दहा वर्षांत आपल्याजवळ इतर पक्षांना फिरकू देखील देत नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी या राज्यात स्विंग करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. तरीदेखील राजस्थान आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये विरोधी पक्षांच्या स्विंगची अंधुक शक्यता उदयास आली आहे. मध्य प्रदेशात मात्र भाजपच्या दिशेने सकारात्मक स्विंग होत आहे. दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश येथे स्विंगमध्ये बदल होत आहे. येथील निवडणूक प्रक्रियेमध्ये केजरीवाल पुन्हा निवडणूक प्रचारात उतरले आहेत. तसेच शेतकर्‍यांच्या प्रश्नाने स्विंगची दिशा विरोधी पक्षांकडे वळवलेली दिसते.

दक्षिण भारतील स्विंग

दक्षिण भारतातील 130 जागांमध्ये भाजप आणि विरोधी पक्ष दोन्हीही स्विंग करतील असेच चित्र आहे. कारण इंडिया आघाडीच्या बाहेर जवळपास 40 टक्के मते आहेत. एनडीए आघाडीची 20 टक्के आणि इंडिया आघाडीच्या बाहेरील 40 टक्के मते यांचे गणित येथे महत्त्वाचे आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या तीन राज्यांमध्ये मिळून एनडीएच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमध्ये अनेक दौरे केले. तसेच आंध्र प्रदेशातील टीडीपीला एनडीएमध्ये आणले.

यामुळे येथे एनडीए सकारात्मक स्विंग करण्याची शक्यता आहे. कर्नाटकमधील पहिल्या टप्प्यात देवेगौडा यांची एनडीए आघाडीला मदत स्विंग करण्यासाठी झाली. पहिल्या टप्प्यानंतर कर्नाटकातील निवडणूक लिंगायत बेल्टमध्ये आली. त्यामुळे एनडीए विरोधी काँग्रेस ही स्पर्धा तीव्र झाली आहे. निवडणुकीतील त्रिकोणी स्पर्धा हा एक महत्त्वाचा घटक आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप, तृणमूल काँग्रेस आणि इंडिया आघाडी अशी त्रिकोणी स्पर्धा आहे. या स्पर्धेमुळे अनिश्चितता जास्त निर्माण झाली आहे. विशेषतः भाजप 2019 ची स्थिती टिकविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

भारतीय निवडणुकीच्या इतिहासातील स्विंग संदर्भात ही एक वेगळी निवडणूक सध्या सुरू आहे. कारण आरंभी निवडणुकीचा स्विंग भाजपकडे सकारात्मक पद्धतीने वळला होता. परंतु चार टप्प्यातील मतदानानंतर भाजप किंवा एनडीए आणि विरोधी पक्ष (इंडिया आघाडी) यांच्यामध्ये तुल्यबळ स्पर्धा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी इतर पक्षांचे नेते अशी सत्तास्पर्धा नरेंद्र मोदी यांनी आखली होती. परंतु सध्या भाजप किंवा एनडीए विरोधी लोक आणि लोकांचे प्रश्न या दिशेकडे सत्तास्पर्धा वळलेली आहे.

पुढील तीन टप्प्यांमध्ये भाजपच्या पुढे मुख्य दोन आव्हाने आहेत. एक, पहिल्या चार टप्प्यांप्रमाणे पुढील तीन टप्प्यांत निवडणूक प्रक्रिया घडावी. असे घडले तर भाजप पुन्हा सत्तेत येण्याच्या शक्यता दाट आहेत. दोन, पहिल्या चार टप्प्यांपेक्षा जास्त स्विंगची दिशा भाजपसाठी सकारात्मक करणे. याउलट इंडिया आघाडीच्या पुढे स्पर्धा तीव्र करणे आणि स्विंग इंडिया आघाडीकडे वळवणे अशी दोन आव्हाने आहेत. तरीही एनडीएचा स्विंग थोडा पुढेच आहे. ही वस्तुस्थिती चार टप्प्यांतील निवडणुकीनंतरची आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news