यंदा विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईनच : उदय सामंत | पुढारी

यंदा विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईनच : उदय सामंत

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत येणा-या सर्व महाविद्यालयांच्या वार्षिक परीक्षा ऑफलाईनच घेण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नागपूर येथे सांगितले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय भवनात आयोजित त्यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरु आणि प्रशासकीय यंत्रणेसमवेत आयोजित आढावा बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत सामंत बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून विविध संघटना विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा घेण्यावरून संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र विद्यार्थ्यांचे भविष्यात एक नागरिक म्हणून उभे राहताना आयुष्यात नुकसान होऊ नये, यासाठी सर्व परीक्षा ऑफलाईनच घेण्यात येतील, असे सांगून विद्यार्थ्यांनी याबाबत निश्चित राहावे. कोरोना काळात ऑनलाईन वर्ग झाले. तेव्हा परिस्थितीच तशी होती. तसेच काही अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थी परीक्षा कालावधीत ती देऊ शकले नाहीत. तर आता त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विद्यापीठ प्रशासनाने कायमस्वरुपी तोडगा काढण्याच्या सूचना सामंत यांनी दिल्या.

ऑफलाईन परीक्षा घेण्याची विद्यापीठ प्रशासनाने भूमिका स्पष्ट करताना ऑफलाईन परीक्षा देण्यातच विद्यार्थ्यांचा फायदा आहे. याबाबत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे. ऑफलाईन परीक्षा देताना १५ मिनिटांचा कालावधी वाढवून देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. गतवर्षी कोविड संक्रमणाची विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती होती. ती परिस्थिती आता राहिली नसून आता विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा देण्याची मानसिकता करावी, असे आवाहनही सामंत यांनी यावेळी केले.

तसेच विद्यार्थ्यांची एकूण संख्या, परीक्षा कालावधी, त्यानंतर निकाल जाहीर करण्याचा कालावधी आणि पुढील शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याबाबतचे वेळापत्रक तयार करुन त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच आश्वासित प्रगती योजना, आणि कर्मचाऱ्यांचे २९६ कोटी रुपये वसुली न करण्याबाबत आदी विषयांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु प्रशांत बोकारे, कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलसचिव रामचंद्र जोशी, प्र. कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, प्रसाद गोखले, उमेश शिवहरे, रोशन अलोने आदी उपस्थित होते.

हेही वाचा  

Back to top button