व्यावसायिकाला 11 लाखांच्या बदल्यात दिली लोखंडी नाणी! | पुढारी

व्यावसायिकाला 11 लाखांच्या बदल्यात दिली लोखंडी नाणी!

पुणे : पुढारी वृत्तसेवा

खोदकामात सापडलेली सोन्या-चांदीची नाणी देण्याच्या बहाण्याने तिघांनी बुधवार पेठेतील एका कापड व्यावसायिकाला 11 लाख रुपयांचा चुना लावला आहे. पैशाच्या बदल्यात या व्यावसायिकाला चक्क लोखंडी नाणी हवाली करण्यात आली आहेत.

China : चीनमध्ये लोकांचा राग होतोय अनावर; शी जिनपिंग संकटाच्या जाळ्यात

‘कोल्हापुरात माझा भाऊ जेसीबीवर चालक असून, तो खोदकाम करतो. एका ठिकाणी खोदकाम करत असताना त्याला सोन्या-चांदीची एक किलो नाणी सापडली आहेत’, अशी थाप या त्रिकुटाने व्यावसायिकाला मारली. याप्रकरणी, घनशाम विठ्ठलदास लढ्ढा (वय 63, रा. रविवार पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक महिला व दोन पुरुष अशा तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 ते 20 मार्च 2022 या कालावधीत हा प्रकार फिर्यादींचे रविवार पेठेतील घर व मूळचंद राम किसन लढ्ढा या बुधवार पेठेतील दुकानात घडला आहे.

आधी भाजपचे सरकार असलेल्या राज्यातील मशिदीवरील भोंगे उतरवा : प्रवीण तोगडीया

सोन्याची नाणी दाखवून मिळवला विश्वास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मार्च रोजी तीन अनोळखी व्यक्ती त्यांच्या दुकानात आल्या. त्यांनी कोल्हापूर येथे माझा भाऊ जेसीबीवर चालक असून, तेथील खोदकामात त्याला एक किलो सोन्या-चांदीची नाणी सापडल्याची बतावणी केली. फिर्यादींना जाळ्यात खेचण्यासाठी त्यांनी सुरुवातीला दोन खरी नाणी दाखवली. फिर्यादी यांना ती नाणी खरी वाटली. त्यानंतर आरोपींनी 11 लाख रुपयांच्या बदल्यात ती सर्व नाणी फिर्यादींना देतो, असे सांगितले. फिर्यादींनादेखील मोह न आवरल्यामुळे त्यांनी आरोपीसोबत व्यवहार केला. दरम्यान, पैसे घेऊन आरोपींनी फिर्यादींना एका कापडी पुरचुंडीत पिवळ्या रंगाच्या धातूची एक किलो नाणी दिली. त्यानंतर फिर्यादींनी ती नाणी गाळण्यासाठी सराफाकडे दिली होती. त्यावेळी ती नाणी सोन्याची नसून लोखंडी धातूची असल्याचे समजले.

थेट सुप्रिया सुळेंसमोर राजेश टोपेंकडून शिवसेनेच्या दोन मंत्र्यांवर आरोप

एक महिला व दोघे पुरूष असे हे आरोपींचे त्रिकूट आहे. सोन्याची नाणी देण्याच्या बहाण्याने ते नागरिकांना जाळ्यात खेचत आहेत. एखाद्या व्यक्तीला संशय येऊ नये म्हणून एकाच कुटुंबातील असल्याचे तिघे भासवत आहेत. त्यामुळे कमी पैशात मिळणार्‍या खोट्या नाण्यांच्या प्रलोभनाला बळी न पडता फसवणूक टाळण्याचे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी केले आहे.

काबूलमध्‍ये शाळेत बॉम्बस्फोट, २५ विद्यार्थी ठार

कोल्हापूर येथील खोदकामात नाणी सापडली असून, कमी पैशात देण्याचे प्रलोभन दाखवत चोरट्यांनी व्यावसायिकाची फसवणूक केली आहे. जेव्हा त्यांनी नाणी तपासून पाहिली तेव्हा ती लोखंडाची असल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. त्यानुसार पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

                                        – अभिजित पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, फरासखाना

Back to top button