थेट सुप्रिया सुळेंसमोर राजेश टोपेंकडून शिवसेनेच्या दोन मंत्र्यांवर आरोप | पुढारी

थेट सुप्रिया सुळेंसमोर राजेश टोपेंकडून शिवसेनेच्या दोन मंत्र्यांवर आरोप

औरंगाबाद ; पुढारी ऑनलाईन : खासदार सुप्रिया सुळे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सोमवारी (दि.१९) औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. राष्ट्रवादीच्या शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांकडून वाईट वागणूक मिळत असल्याचा आरोप केला.

महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून तिन्ही पक्षात नेहमी धुसफुस असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान वरिष्ट नेत्यांकडून महाविकास आघाडीत तीन्ही पक्षात कोणतेही वितूष्ट नसल्याचे वारंवार सांगण्यात आले. परंतू आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गंभीर आरोप केला आहे. शिवसेनेचे मंत्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फोडाफाडी करत असल्याचा आरोप टोपेंनी केला. विशेष म्हणजे टोपेंनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासमोर हा पाढा वाचला.

मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धमकावत असल्याची तक्रार खुद्द राजेश टोपे यांनी केली. या वेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. त्यामुळे आघाडीत बिघाडी असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे म्हणतात…..

रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी यावर खुलासा केला आहे, मंत्री राजेश टोपे काय म्हणाले मला माहित नाही. पण माझ्या मतदार संघात असे काही घडत नाही. मी कोणत्याही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची फोडाफाडी केली नाही. माझ्याकडे कोणत्याही पक्षाचे लोक आले तर मी त्यांचे काम करतो. पण तालुक्यातील राष्ट्रवादीचे दोन-तीन नेते सतत खोटे आरोप करतच असतात, त्यामुळे त्यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना काय सांगितले हे मला माहित नाही, असे भुमरे म्हणाले.

केंद्र सरकारचा धाडींचा विक्रम : देशमुखांवर १०३ वेळा धाडी

केंद्र सरकारने धाडींचा विक्रम केला आहे. अनिल देशमुख यांच्यावर १०३ वेळा धाडी टाकल्‍या आहेत. हा एक विक्रमच आहे. पण या धाडी कशासाठी होत्या? तसेच देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांचा आरोप होता, त्यातून पुढे काय सिद्ध झाले? असा सवाल त्‍यांनी उपस्‍थित केला.

सिल्व्हर ओक म्‍हणजे माझ्या आईवर हल्ला

संपूर्ण देश, राज्य ही आमची आई आहे. सिल्व्हर ओकवर तो हल्‍ला झाला तो माझ्या आईवर हल्ला होता. ज्या महिलांनी हल्ला केला त्यांना मला भेटायचं आहे. तसेच मी या संदर्भात पोलीस यंत्रणेला विनंती केली आहे. त्‍यांना भेटून त्या महिला अशा का वागल्या? हे मला समजून घ्यायचे आहे. ही मराठी संस्कृतीच नाही, हे समजून घेणे माझी जबाबदारी आहे, असे सुळे सुप्रिया म्‍हणाल्‍या.

Back to top button