'महाविकास आघाडीचे २५ आमदार संपर्कात, पण नावे उघड करून त्यांची आमदारकी धोक्यात आणणार नाही'
पुढारी ऑनलाईन डेस्क : महविकास आघाडीचे २५ आमदार आमच्या संपर्कात आहेत, निवडणुका लागतील तेव्हा हे सर्व आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील. अधिवेशना दरम्यान हे आमदार संपर्कात होते, असा दावा केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. रावसाहेब दानवे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
ज्यांचे मरण आले आहे, ते खड्ड्यात जातील. भाजपमध्ये असे कोणीच नाही ज्यासाठी महाविकास आघाडी खड्डा खोदू शकेल. खोदताना यांच्याच अंगावर न पडो, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली. महाविकास आघाडीचे २५ आमदार संपर्कात आहेत पण सध्या त्यांची नावे जाहीर करून त्यांची आमदारकी धोक्यात आणायची नाही, असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
ऱावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, ज्या दिवशी शिवसेनेने आम्हाला सोडलं आणि महाविकासआघाडीत गेले त्याचदिवशी शिवसेनेचा भगवा रंग संपुष्टात आला. शिवसेनेने आता हिरवे पांघरून घेतले आहे, आता शिवसेना हिरव्याचं समर्थन करते. दाऊद इब्राहीमच्या पाठीमागे उभा राहणाऱ्या मंत्र्याचा जेलमध्ये गेला. तरीही राजीनामा घेतला नाही हे जनतेला सहन होणार नाही. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता राहिली नाही.