कोल्हापूर उत्तर : भाजपकडून सत्यजित कदमांची उमेदवारी निश्चित; औपचारिक घोषणा बाकी | पुढारी

कोल्हापूर उत्तर : भाजपकडून सत्यजित कदमांची उमेदवारी निश्चित; औपचारिक घोषणा बाकी

कोल्‍हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून माजी नगरसेवक सत्‍यजित कदम यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित झाली आहे.

भाजपचे प्रदेश अध्‍यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्‍हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून सत्‍यजित कदम व महेश जाधव यांची नावे पाठविली होती. यामध्‍ये सत्‍यजित कदम यांच्‍या नावाला आम्‍ही एकमताने सहमती दिली आहे. दिल्‍लीतून या उमेदवारीची घोषणा होईल, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक कोणत्‍याही परिस्‍थितीत बिनविरोध होणार नाही. असेही चंद्रकांत पाटील यांनी स्‍पष्‍ट केले.

महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असून सर्वच समाज घटकांवर अन्याय केला आहे. या सरकारबद्दल जनतेत प्रचंड नाराजी आहे. भारतीय जनता पार्टी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात जनतेचा आदेश मिळवून पोटनिवडणूक जिंकेल, असा आत्मविश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, ईडीने अटक केलेले महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांची खाती काढून घेणे आणि पालकमंत्रीपद काढून घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. तथापि, ते पुरेसे नाही. नवाब मलिक यांना मंत्रिपद सोडावेच लागेल.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने सत्यजित कदम आणि महेश जाधव अशा दोन नावांची केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला शिफारस केली असून पक्षातर्फे कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय लवकरच पार्लमेंटरी बोर्डाकडून होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Back to top button