सटाणा : रोटावेटर चोरी प्रकरणाची उकल ; चौघांच्या आवळल्या मुसक्या, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

सटाणा : रोटावेटर चोरी प्रकरणाची उकल ; चौघांच्या आवळल्या मुसक्या, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त

सटाणा : ( जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
लखमापूर येथील दुकानातून वर्षभरापूर्वी झालेल्या रोटावेटर चोरी प्रकरणाची उकल करण्यात सटाणा पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. संशयित पाच आरोपींना अटक झाली असून, त्यांच्याकडून आठ लाख 91 हजार 443 रुपये किमतीच्या आठ दुचाकी, दोन रोटावेटर व एक 42 इंची टीव्ही असा मुद्देमालदेखील हस्तगत करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सुभाष अनमूलवार यांनी रविवारी (दि. 27) पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली.

लखमापूर येथील रोहित बच्छाव यांच्या साई अ‍ॅग्रो या दुकानासमोर ठेवलेले 1 लाख 65 हजार 682 रुपये किमतीचे दोन रोटावेटर 25 जानेवारी 2021 रोजी चोरीला गेले होते. या प्रकरणी सटाणा पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली होती. गुन्ह्याच्या घटनास्थळी तांत्रिक तपासादरम्यान योगेश उर्फ सोन्या आप्पा ठोके (दर्‍हाणे) याचा मोबाइल मिळून आला होता. त्याचा शोध घेऊनही तो मिळून आला नाही. त्याच्या मोबाइलचे विश्लेषण केले असता त्यावरून संजय किशोर गायकवाड (28, रा. आनंदवाडी, मनमाड) यांच्याशी संपर्क झाल्याचे दिसले. गायकवाड याचा शोध घेऊ अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली देऊन त्याच्या सोबत असलेले साथीदार संदीप उर्फ उलुशा बाजीराव सोनवणे (24,रा. ब्राह्मणगाव शिवार), राजेश श्यामशंकर शर्मा उर्फ राज बिहारी उर्फ भैय्या (30, रा. नीमच, मध्य प्रदेश), योगेश ठोके हे सोबत असल्याचे सांगितले होते. तसेच चोरीस नेलेले रोटावेटर संदीप व राजेश यांनी विक्री केल्याचे सांगितले. परंतु त्या वेळी संशयितांचा शोध घेऊनही ते मिळून आले नव्हते.

दरम्यान दि.21 फेब्रुवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास यातील फरार आरोपी संदीप उर्फ उलुशा बाजीराव सोनवणे हा संजय परदेशी (रा.नवी शेमळी) यांच्या शेतातील सालदाराच्या खोलीमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याला दि. 28 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. या काळात त्याने 2 लाख 57 हजार 182 रुपयांचे तीन रोटावेटर काढून दिले.

पोलिसांनी इतर आरोपींचा माग काढला. राजेश शर्मा, अनिल डांगे (28, रा. लोणी खुर्द, वैजापूर), श्रीराम सोमनाथ सोनवणे (19, रा. वाकला, वैजापूर), राकेश अशोक संसारे उर्फ पांडे (30, रा. आनंदवाडी पुलाजवळ, मनमाड) हे 24 फेब्रुवारी रोजी रात्री एकच्या सुमारास अभोणा येथे मिळून आले. त्यांच्याकडून 8 लाख 91 हजार 440 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

चौघांना न्यायालयाने दोन मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून त्यांच्याकडून आणखी इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनमूलवार, सहायक पोलिस निरीक्षक किरण पाटील, उपनिरीक्षक राहुल गवई करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button