यंदा जोतिबाची चैत्र यात्रा होण्याचे संकेत | पुढारी

यंदा जोतिबाची चैत्र यात्रा होण्याचे संकेत

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दोन वर्षे न झालेली दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा यावर्षी होण्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने यात्रेची तयारी सुरू केली आहे. मंदिर परिसरात उभारण्यात येत असलेल्या दर्शन मंडपातून यावर्षी भाविकांची दर्शन रांग केली जाणार आहे. त्याची प्राथमिक पाहणी रविवारी करण्यात आली.

महाराष्ट्रच नव्हे, तर कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जोतिबा डोंगरावरील यात्रेच्या मुख्य दिवशी पाच लाखांवर भाविक हजेरी लावतात. मात्र, गेली दोन वर्षे केवळ प्रातिनिधिक स्वरूपात धार्मिक विधी करत यात्रा झाली होती. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होत जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले आहे आहेत. यामुळे जोतिबाच्या खेट्यांना भाविकांना प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

येत्या मार्चपासून राज्यातील निर्बंध हटवण्याची शक्यता आहे. यामुळे एप्रिल महिन्यात होणारी जोतिबाची यात्रा पूर्वीप्रमाणे भाविकांच्या उपस्थितीत होण्याची दाट शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरूनच देवस्थान समितीने यात्रेची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. रविवारी समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. मंदिराच्या परिसरात दर्शन मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. .

या मंडपाचे आतील मजल्याचे स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. चौथ्या मजल्यावरील स्लॅबचे काम दि. 15 मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. दर्शन मंडपातील या तीन मजल्यावर यावर्षी जोतिबा यात्रेची भाविकांची दर्शन रांग राहील. यामुळे मंदिर आवारातील गर्दी कमी होऊन, सासनकाठी मिरवणुकीला जागा उपलब्ध होईल, असे नाईकवाडे यांनी सांगितले.

Back to top button