जोतिबा डोंगर : पुढारी वृत्तसेवा
दख्खनचा राजा जोतिबाचा दुसरा खेटा रविवारी चांगभलंच्या गजरात पार पडला. या खेट्यालाही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. पहाटे चार वाजता मंदिराचे दरवाजे खुले झाले. श्रींची पाद्यपूजा व काकड आरतीनंतर भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. आठ वाजता श्रींना अभिषेक घालून खडी अलंकारीक पूजा बांधण्यात आली . दुपारी धूपआरती सोहळा झाला. दिवसभर दर्शनासाठी भविकांची वर्दळ होती.
दिवसभरात शाहूवाडी प्रांताधिकारी अमित माळी, पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी व्यवस्थेची पाहणी केली. सायंकाळी श्रींचा पालखी सोहळा झाला.
देवस्थान समितीकडून 150 खासगी गार्ड, देवस्थान कर्मचारी यांची दर्शन रांगेसाठी व्यवस्था केली होती. तसेच दर्शन रांग व मंदिरात सीसीटीव्ही, मंदिराबाहेर दर्शन रांगेसाठी मांडव घालण्यात आल्यामुळे भाविकांना उन्हाचा ताण जाणवला नाही. यासाठी दीपक म्हेतर व कर्मचारी रात्रभर कामात दिसून आले. पोलिस प्रशासन, महसूल विभाग, ग्रामपंचायत यांचेदेखील सहकार्य लाभले.