सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
विदेशी मद्याची वाहतूक करणार्या ट्रकला करमाळा तालुक्यात अपघाताचा बनाव करून करून 40 लाखांचा मुद्देमाल चोरण्यात आला होता. ती दारू अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव येथे विकण्यात आली होती. सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून तो मुद्देमाल जप्त केला. पथकाने याप्रकरणी ट्रकचालकासह दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी दारू विकत घेणारा व ट्रकमालक फरार आहे.
ट्र्रकचालक जहिर रफिक अत्तार (वय 49, रा. नाशिक) आणि विष्णु मधुकर डमाळे (वय 42, रा. ईमामशाही, कोळीवाडा, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मद्य विकत घेणारा दामू जाधव (रा. घोडेगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर) आणि ट्रकमालक गुलाम महंमद अन्सारी (रा. नाशिक) हे दोघे फरार आहेत. 23 फेबु्रवारी रोजी नाशिक जिल्ह्यातील परमोरी (ता. दिंडोरी) येथील मे. युनायटेड स्पिरीट लिमिटेड या कारखान्यातून विदेशी मद्याच्या 1000 बॉक्सचा साठा सोलापूरला पाठविला होता. तो ट्रकमधून सोलापूर जिल्ह्यातील मे. अरतानी ट्रेडर्स यांना पोहोच करण्यात येणार होता. दरम्यान, 25 फेब्रुवारी रोजी जातेगाव हद्दीत (ता. करमाळा) या ट्रकला रस्त्याच्या कडेला उलटून अपघात झाल्याचा बनाव ट्रकमालक, ट्रकचालकांनी केला. याबाबत करमाळा पोलिसांना माहिती देण्यात आली.
अपघातग्रस्त ट्रकची तसेच घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळावर ट्रकमधून येणार्या 1000 मद्याच्या बॉक्सपैकी केवळ 398 बॉक्स व 5 बाटल्या सुस्थितीत तर 7 बॉक्स फुटलेल्या स्थितीत आढळून आले. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला संशय आला. ट्रकचालक जहिर अत्तार यास पोलिसांनी खाक्या दाखविला. त्यानंतर त्याने ट्रकमधील 595 बॉक्स दारू ही नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील दामू जाधव यास अवैधरीत्या विकल्याचे कबूल केले.