पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियाने रोनाल्डो शानदार फॉर्न्म कायम राखत आपल्या नावावर आणखी एका विक्रमची नोंद केली आहे. रोनाल्डो सौदी प्रो लीगच्या एकाच हंगामात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे. रोनाल्डोने अल नासरच्या अल इतिहादविरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली. त्याने अल इतिहाद विरुद्धच्या सामन्यात दोन गोल केले. 2023-24 हंगामातील 34वा आणि 35वा गोल नोंदवत त्याने ही विक्रमी केली.
रोनाल्डोने दोन गोल करत अल नासरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. रोनाल्डोने या सामन्यातील आपला पहिला गोल पहिल्या हाफच्या एक्स्ट्रा टाईममध्ये केला. (४५+३ मिनिटे) तर 69 व्या मिनिटाला हेडरद्वारे दुसरा गोल केला. हा गोल नोंदवताच तो सौदी प्रो लीगच्या एकाच मोसमात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला. रोनाल्डोच्या दोन गोलच्या जोरावर अल नासरने अल इत्तिहादचा 4-2 असा पराभव केला. अल नासरने 34 सामन्यांत 26 विजय आणि 82 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर हंगाम संपवला. अल हिलाल 34 सामन्यांतून 31 विजयांसह 96 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
सौदी प्रो लीगमध्ये एकाच मोसमात सर्वाधिक गोल केल्यानंतर, रोनाल्डोने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे त्याच्या यशावर प्रतिक्रिया दिली. त्याचे फोटो शेअर करताना त्याने कॅप्शन लिहिले की, मी रेकॉर्डच्या मागे धावत नाही, रेकॉर्ड माझ्या मागे धावतात.
सौदी प्रो लीगमध्ये सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत रोनाल्डोने मोरोक्कोच्या अब्देरझाक हमदल्लाहला मागे टाकले आहे. 2018-19 च्या मोसमात अब्देरझाक हमदल्लाहने एकूण 34 गोल केले होते. आता रोनाल्डोने हमदल्लाहला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला. रोनाल्डो डिसेंबर २०२२ मध्ये या लीगमध्ये सामील झाला हाेता.
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आत्तापर्यंत वेगवेगळ्या चार लीगमध्ये खेळला आहे. यामध्ये युरोपमध्ये खेळली जाणारी प्रिमियर लीग, स्पेनमधील स्पॅनिश लीग, इटलीमधील सिरी-ए आणि सौदीमधील सौदी प्रो लीग या लीगमध्ये तो खेळला. या सर्व लीगच्या एका मोसमात सर्वाधिक गोल करण्याच्या विक्रमही रोनाल्डोच्या नावावर आहे.