कोल्हापूर : ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाचा उद्रेक, संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणचे कार्यालय पेटवले | पुढारी

कोल्हापूर : 'स्वाभिमानी'च्या आंदोलनाचा उद्रेक, संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणचे कार्यालय पेटवले

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मागील दोन दिवसांपासून कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांना दिवसा दहा तास शेतीसाठी वीज मिळावी, या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला वेळोवेळी इशारा देऊनही सरकारने दुर्लक्ष केल्याने संतप्त अज्ञात शेतकऱ्यांनी कागल (जि. कोल्हापूर) येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटविले.

छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या अग्निशमनाची गाडी आणून आग आटोक्यात आणण्याचा महावितरणकडून प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतीला सलग १० तास दिवसा वीज द्या या मागणीसाठी दुसऱ्या दिवशीही महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू होते. यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन राजू शेट्टींनी केले.

“महावितरणच्या वीज निर्मितीमध्ये साखर कारखान्यापेक्षाही सर्वात मोठा घोटाळा असून तो लवकरच चव्हाट्यावर आणू. कंपनीमध्ये मंत्र्यांचे लागेबंधे आहेत. जनतेच्या पैशाची सरकारकडून लूट सुरू आहे. शेतकऱ्यांचे वाटोळे महाविकास आघाडी सरकार करत असेल तर मंत्र्यांनाही तुडवू .राज्यातील जनतेला लुबाडायचे आणि त्यांच्या घरावर दरोडे घालायचे धंदे बंद करावे”, अशी बोचरी टीका  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.

राधानगरीसारखा वीज निर्मिती प्रकल्प आज रोजी बंद आहे. खासगी कंपन्यांना मलिदा मिळावा यासाठीच हा प्रकल्प सरकारने बंद केला आहे. धरणाची क्षमता ८.३६ टीएमसी आहे. विद्युत निर्मितीसाठी १.२ मेगावॅटची विसर्ग असणारी ४ जनेंद्रे बसवली आहेत. तरीही विद्युत निर्मिती बंद ठेवली आहे. राज्यात २३ हजार मेगावॅटची रोजची गरज आहे. यापैकी महानिर्मितीकडून दैनंदिन १० हजार मेगावॅटची निर्मिती होऊ शकते. पण ५५०० मेगावॅटची निर्मिती केली जाते.

“मंत्र्यांच्याच खासगी कंपन्या असलेल्या कंपन्याकडून वीज खरेदी सुरू असावी म्हणून ४५०० मेगावॅट वीज निर्मितीचे प्रकल्प बंद ठेवले आहेत. या खासगी वीज निर्मिती कंपन्याकडून ६ रूपये प्रति युनिट ते २५ रूपये प्रतियुनिटपर्यंत वीज खरेदी करून सर्व सामान्य जनता व शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा टाकला जात आहे. मंत्रालयाच्या दालनांची वीज अहोरात्र सुरू असते. मंत्रालयात देखील दारूच्या बाटल्या सापडू लागल्या आहेत. तिथे हीच धंदे सुरू असतात काय? मंत्र्याचे दालने दिवसाही विजेने चमकत असतात. सरकारच्या तिजोरीतून पैसा उचलून विजेची बिले भागवली जातात. अन्नदात्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारकडून नागवले जात आहे.”

माणसापेक्षा जंगली प्राण्यांची किंमत जास्त आहे. विजेचा धक्का लागून हत्ती मारला गेला, तर नुकसान भरपाई २५ कोटीची वसुली शेतकऱ्यांकडून केली जाते. शेतकऱ्याला विजेचा धक्का बसून मृत्युमुखी झाला, तर केवळ २ लाख रूपये नुकसान भरपाई दिली जाते. या तीन कुबड्याच्या सरकारने शेतकऱ्यालाच अस्थिर केले आहे. राज्यात धरणे बांधली गेली, जमिनी शेतकऱ्यांच्या घेतल्या गेल्या. पुनर्वसन देखील शेतकऱ्यांच्या जमिनीवर केला गेला. सरकारमधील मंत्र्यांना सत्तेची मस्ती आली आहे. मस्तीत व सत्तेच्या धुंदीत जनता तुम्हाला रस्त्यावर आणेल, असा इशाराही यावेळी संघटनेकडून दिला.

यावेळी प्रा. जालंधर पाटील, राजेंद्र गड्ड्यान्नावर, जनार्दन पाटील, जयकुमार कोले, सागर कोंडेकर, सचिन शिंदे, विक्रम पाटील, सागर संभूशेटे, शैलेश आडके, अजित पवार, राम शिंदे, पोपट मोरे, शमसुद्दीन सनदे, डाॅ. बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येेने उपस्थित होते.

हे ही वाचा :

Back to top button