सांगली : खूनप्रकरणी दोघांना आजन्म कारावास | पुढारी

सांगली : खूनप्रकरणी दोघांना आजन्म कारावास

सांगली : पुढारी वृतसेवा

प्रकाश घाडगे (रा. उमदी, ता. जत) यांचा खून केल्याबद्दल शशिकुमार विठ्ठल शितोळे (वय 27) आणि शंकर आप्पासाहेब क्षेत्री (वय 27, दोघे रा. चडचण, ता. इंडी, जि. विजापूर) या दोघांना आजन्म कारावास व प्रत्येकी 10 हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांनी सुनावली.

सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख व अतिरिक्‍त सरकारी वकील आरती देशपांडे (साटविलकर) यांनी काम पाहिले. खटल्याची पार्श्‍वभूमी अशी : प्रकाश घाडगे यांची मुलगी तेजस्विनी हिचे लग्‍न चडचण येथील आरोपी शशिकुमारचा भाऊ रवि शितोळे याच्याशी झाले होते. लग्नात तेजस्विनीच्या माहेरच्या लोकांनी मानपान केला नाही, चांगली वागणूक दिली नाही, या कारणावरून रवी शितोळे व त्याचे कुटुंबीय तेजस्विनीचा छळ करीत होते. या कारणावरुन दोन्ही कुटुंबियांमध्ये वाद होता. फेब्रुवारी 2014 मध्ये प्रकाश घाडगे व त्यांच्या पत्नी तेजस्विनीच्या घरी चडचण येथे भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेजस्विनीच्या माहेरच्या व सासरच्या लोकांमध्ये वादावादी झाली होती. यामध्ये तेजस्विनीच्या वडिलांनी रवीच्या आईला मारहाण केली. आईला मारल्यामुळे शशिकुमारने प्रकाश घाडगे यांना धमकी दिली होती.

दि. 4 ऑक्टोबर 2014 रोजी सायंकाळी घाडगे व त्यांचे कुटुंबिय घरात  होते. त्यावेळी बाहेरून आवाज आल्यानंतर घाडगे, त्यांच्या पत्नी व मुलगी हे भवानी चौक येथे आले. तिथे दोन्ही आरोपी होते. “तू माझ्या आईला का मारलेस? तुला जीवंत सोडत नाही”, असे म्हणून आरोपी शशिकुमारने चाकूने प्रकाश यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली. शंकर क्षेत्री याने चाकू व चेनने त्यांच्यावर वार केले. प्रकाश घाडगे जीव वाचविण्यासाठी पळत होते. घाडगे यांच्या पत्नी व मुलीने, लोकांच्या मदतीने घाडगे यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी घाडगे यांच्या पत्नीने पोलिसात फिर्याद दिली. सरकार पक्षातर्फे तेरा साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी बहुसंख्य साक्षीदार सुनावणी दरम्यान फितूर झाले. परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने शशिकुमार शितोळे व शंकर क्षेत्री यांना भा. दं. वि. कलम 302 अन्वये दोषी ठरवून शिक्षा सुनावली. सरकार पक्षाला सहाय्यक फौजदार राडे, वंदना पवार, गणेश वाघ, सोन्या लोंढे यांनी मदत केली.

Back to top button