जनतेच्या संपत्तीवर वाईट नजर असलेल्या काँग्रेसला घरी बसवा: PM मोदी | पुढारी

जनतेच्या संपत्तीवर वाईट नजर असलेल्या काँग्रेसला घरी बसवा: PM मोदी

लातूर, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसने नागरिकांची संपत्ती लुटण्याचा घातकी डाव आखला आहे. त्यासाठी ते देशवाशीयांच्या कामाईचा एक्सरे काढणार असून तुमच्या कमाईतील ५५ टक्के हिस्स्यावर कब्जा करुन तो ते त्यांच्या व्होट बँकेला वाटू शकतात. कष्टाच्या कमाईवर अशी वाईट नजर असलेल्या काँगेसला घरी बसवा. भाजप, महायुतीच्या उमेदवारास बहुमताने विजयी करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूर येथे आयोजित विराट जनआशीर्वाद सभेतून केले. अंग भाजून काढणारे ऊन असतानाही या सभेसाठी मोठा जनसमुदाय लोटला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, अशोक चव्हाण, किरण पाटील, जोगेंद्र कवाडे, उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

शैक्षणिक क्षेत्रात नाव गाजवणाऱ्या लातुरकरांना माझा नमस्कार, अशा मराठी संबोधनाने नरेंद्र मोदी यांनी सभेस सुरुवात केली. मोदी म्हणाले काँग्रेसची नजर केवळ तुमच्या वर्तमान कमाईवरच नाही. तर तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी कमावून ठेवलेल्या संपत्तीवरही वारसा कराच्या रुपाने त्यांचा डोळा आहे. त्यांचा जाहीरनाम्यावर मुस्लीम लिगची छाप आहे. अशांना तुम्ही साथ देणार का? असा सवाल त्यांनी यावेळी केला. आपला देश गत दहा वर्षांपासून विविध क्षेत्रात गतीने पुढे जात आहे. क्रीडा क्षेत्रात खेळाडू विक्रम करीत आहेत. विविध क्षेत्रातही नव नवीन रेकॉर्ड बनत आहेत. जगात भारतीय अर्थव्यवस्था गतीने प्रगती करीत आहे. देशाच्या सीमेवर वाईट नजर ठेवण्याची आता कोणाची हिंमत उरली नाही. कोणी आगळीक केली. तर त्याला कसा धडा शिकवतो, हे सर्जीकल स्ट्राईलने दाखवले आहे. आयआयटी, आयआयएम, एम्स चा मोठा विस्तार झाला आहे. देशात वेद्यकीय महाविद्यालयाची तसेच जागांची संख्या वाढवली आहे.

देशाला तुकड्या तुकड्यात पहाणारे काँग्रेसचे लोक आता पंतप्रधान पदही तुकड्या तुकड्यात वाटू इच्छितात. बारी बारीने या माध्यामातून देशाला लुटण्याची त्यांची योजना आहे. काँग्रेसने एसी, एसटी, ओबीसींचे नेतृत्व कधीही पुढे येऊ दिले नाही. मात्र, आम्ही या घटकांना प्राधान्य देत ६० टक्क्यांपेक्षा अधिक प्रतिनिधित्वही दिले. मोफत घरे, मुद्रा लोन, हर घर नल, महिला आरक्षण अशी अनेक लोककल्याणकारी कामे करुन सामाजिक न्यायाला ताकद दिली. तथापि काँग्रेसने केवळ समस्याच दिल्या. समस्या आणि काँग्रेस ही जुळी भावंड आहेत, अशी टीका मोदींनी यावेळी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसने देशात भ्रष्टाचाराचा पॅटर्न तयार केला होता. परंतु, भाजपाच्या नेतृत्वातील सरकारने विकासाचा नवा पॅटर्न सेट केला आहे. युतीकडे महामार्गांचे जाळे आहे. तर आघाडीकडे रस्त्यांवर फिरूनही लाँच न होणारा युवराज असल्याची टीका केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुका संपताच शेतकर्‍यांना सोयाबीन भावांतराचे ४ हजार कोटी देण्याचा निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले. विरोधकांकडे नेता, नीती व नियतही नाही. ते देश चालवू शकत नाहीत. त्यांची गाडी विना डब्यांची असल्याची टिका केली. प्रेरणा होनराव यांनी सूत्रसंचलन केले.

खुद्द बाबासाहेबांनाही संविधान बदलता येणार नाही

भाजप संविधान बदलणार असा प्रचार काँग्रेस करीत आहे. तथापि संविधान कोणालाही व कधीही बदलता येणार नाही. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही ते बदलावे वाटले तरीही त्यांनाही ते शक्य होणार नाही, असेही मोदी म्हणाले.

ऑलिम्पिक स्पर्धा भरवणे हे माझे स्वप्न

2036 मध्ये आपल्या देशात ऑलिम्पिक स्पर्धा भरवणे, हे माझे स्वप्न आहे. 2029 ला युवा ऑलिंम्पिक स्पर्धा पार पाडण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. मी कधीही छोटा विचार करीत नाही. देवाने मला घडविताना अशी कुठलीतरी चिप बसवली असल्याने मी छोटा विचार करूच शकत नाही. नेहमीच मोठा विचार करतो, असेही मोदी म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button