नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : ब्रिटनमधील वॉडिंग्टन येथे ६ ते २७ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 'एक्स कोब्रा वॉरियर २२' या बहुराष्ट्रीय युद्धाभ्यासात भारतीय हवाई दल सहभागी होणार आहे. वायुदलाचे 'तेजस' हे वजनाने हलके लढाऊ विमान यामध्ये भाग घेणार असून ब्रिटनसह इतर काही देशांच्या वायुदलाची लढाऊ विमानेही या सरावात भाग घेतील, असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
सहभागी होणाऱ्या हवाई दलांना कार्यात्मक अनुभव मिळावा तसेच त्यासाठीच्या उत्तम कार्यपद्धतींची व तंत्रांची देवाणघेवाण करता यावी, जेणेकरून या देशांची लढाऊ क्षमता वाढेल आणि परस्परांमध्ये मैत्रीभाव निर्माण होण्यास मदत होईल, अशा एकत्रित उद्देशांनी युद्धाभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे. 'तेजस' ची कार्यक्षमता आणि कौशल्य सिद्ध करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची संधी आहे, असे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या युद्ध सरावासाठी 'तेजस' प्रकारची पाच विमाने ब्रिटनला रवाना होणार असून, या सरावाशी संबंधित अन्य वाहतुकीच्या कामांसाठी भारतीय वायुदलाचे सी-१७ विमान उपयोगात आणले जाणार असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.