उमरगा तालुक्यात भीषण पाणी टंचाई; १२५ हातपंप नादुरुस्त | पुढारी

उमरगा तालुक्यात भीषण पाणी टंचाई; १२५ हातपंप नादुरुस्त

उमरगा ( जि. धाराशिव ) : शंकर बिराजदार : तालुक्यात अनेक गावांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ग्रामीण भागातील १२५ हातपंप नादुरुस्त आहेत. तर काही कोरडे पडले आहेत. उमरगा व लोहारा तालुक्यात हातपंप दुरुस्तीसाठी चार कंत्राटी कामगाराचे फक्त एकच युनिट कार्यरत आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांची आज मंगळवारी, (दि ३०) रोजी मुदत संपली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना उन्हात पाणी टंचाईचे अधिक चटके सोसावे लागत आहेत.

तालुक्यात गेल्या वर्षीच्या कमी पावसामुळे नदी, नाले, ओढे व तलावात पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. यामुळे जल साठ्यांतील दिवसेंदिवस पाणी आटत चालले आहे. अनेक जलसाठे कोरडे पडले आहेत. पाण्यासाठी नागरिकांना अनेक हाल अपेष्टा सोसाव्या लागत आहेत. अनेक गावातील पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे विहिरी, विंधन विहीर व हातपंप शेवटच्या घटका मोजत आहेत. काही गावात पाण्याचा आधार असलले हातपंप मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून नादुरुस्त अवस्थेत आहेत.

पंचायत समितीकडे उमरगा व लोहारा तालुक्यातील हातपंप दुरुस्तीसाठी चार कंत्राटी कामगाराचे फक्त एकच युनिट आहे. दुरुस्तीची कामे करीत असताना या युनिटवर चालकासोबत तीन माणसे काम करीत आहेत. उपलब्ध जूने साहित्य वापरून दिवसाला एक किंवा दोनच पंप गावांमध्ये दुरुस्ती केली जात आहे.

जिल्हा परिषदेमार्फत यांत्रिकी विभागात नेमणूक करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मंगळवारी कार्यकाळ संपला आहे. नवीन पदभरती करून युनिट व कर्मचारी यांची संख्या वाढवावी तसेच दुरुस्तीसाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. दरम्यान लोहारा पंचायत समितीकडे तालुक्यातील हातपंपाची माहिती विचारली असता याला प्रतिसाद मिळाला नाही.

तालुक्यात १२५ हातपंप नादुरुस्त

उमरगा तालुक्यात वाडी, वस्ती, तांड्यासह ९५ गावे तर ८० ग्रामपंचायती आहेत. यातंर्गत गावात ५६८ हातपंप असून यापैकी ४४८ हातपंप करारनामा केलेले आहेत. यात ७८ आठमाही तर बारमाही चालणाऱ्या ३७० हातपंपाचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून १२० हातपंप कायमस्वरूपी तर सध्या ०४ हातपंप नादुरुस्त अवस्थेत आहेत.

टॅकर व अधिग्रहीत स्त्रोतांद्वारे पाणी पुरवठा

तालुक्यातील सहा गावाना टॅकरने पाणी पुरवठा सुरू आहे. पंचायत समितीकडे ५८ गावातील विहिरी व विंधन विहिर अधिग्रहणाचे १६६ प्रस्ताव दाखल झाले आहेत. यातील मंजूर १३७ प्रस्तावापैकी ११२ अधिग्रहित पाण्याच्या स्त्रोतांद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. पाण्या अभावी २५ अधिग्रहण बंद असून तहसीलकडे ०८ प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. एकाचा पंचनामा होणं बाकी आहे.

हातपंप बंद व नादुरुस्त होण्याची कारणे

तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून पंप दुरुस्तीसाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा करण्यात आला नाही. यांत्रिकी कर्मचारी रिक्त पदे, पाणी पातळी कमी व गाळाने अडकलेले, पाईप लाईन कट, रॉड व साखळी तुटने अशा वेगवेगळ्या कारणांनी पाणी असूनही १२० हातपंप कायमस्वरूपी नादुरुस्त अवस्थेत आहेत.

Back to top button