सांगली : पुढारी वृत्तसेवा
पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखर सम्राटांची टोळी तयार झाली आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी केला. एकरकमी एफआरपीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी तिरडी मोर्चा काढला. तो पोलिसांनी रोखला. यावेळी तिरडी काढून घेताना कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने एकरकमी एफआरपी देतात परंतु सांगली जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे कारखाने मात्र देत नाहीत. याच्या निषेधार्थ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तिरडी मोर्चा काढण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चात अचानक तिरडी आणण्यात आली. ती हिसकावून घेताना पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची आणि झटापट झाली. तिरडी काढून घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी रस्त्याकडेला असलेल्या झाडाच्या फांद्या तोडून त्याची तिरडी बनविण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. त्यानंतर पोलिसांनी हिसकावून घेतलेल्या तिरडीच्या काही भागाचे दहन करून पालकमंत्री जयंत पाटील आणि पोलिसांच्या नावाने शंखध्वनी करण्यात आले.
शेट्टी म्हणाले, जिल्ह्यात पालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखर सम्राटांची टोळी तयार झाली आहे. कोल्हापूरप्रमाणे सांगली जिल्ह्यातील कारखाने देखील एकरकमी एफआरपी देण्यास तयार होते. परंतु ना. पाटील यांनी त्याचा खेळखंडाबा केला. त्यांनीच दबाव आणल्यामुळे सर्व कारखान्यांनी 2600 रुपये उचल देऊन एफआरपीचे तुकडे पाडले आहेत.
ते म्हणाले, ना. पाटील सत्तेचा वापर करत आहेत. त्यांनी पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आजचा मोर्चा हाणून पाडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु राज्यातील काही बड्या पोलिस अधिकार्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. अशा या राज्यातील पोलिसांवर कसा विश्वास ठेवायचा? इंग्रजांच्या काळातदेखील झाला नव्हता, असा अन्याय सांगली पोलिसांनी केला आहे.
ते म्हणाले, ऊस तोडणीनंतर 14 दिवसांच्या आत एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक आहे. विलंब केल्यास 15 टक्के व्याज द्यावे लागते. जिल्ह्यात जलसंपदामंत्री आणि कृषी राज्यमंत्री असताना कारखानदार शेतकर्यांना एकरकमी एफआरपी देत नाहीत. कारखानदारांकडून शेतकर्यांच्या हक्काचा पैसे बुडविण्यात येत आहे.
ते म्हणाले, समस्त शेतकर्यांची कैफियत मांडण्यासाठीच हा तिरडी मोर्चा होता. तो अडविण्याचे पोलिसांना काहीही कारण नव्हते. शेतकर्यांच्या पोटावर पाय देणार्या धनदांडग्यांच्या विरोधात हा मोर्चा होता.
ते म्हणाले, सततच्या नुकसानीमुळे शेतकर्यांचे प्रचंड मोठे नुकसान होत आहे. त्यातच कारखानदार उसाची काटामारी करीत आहेत. तोडीसाठी पैसे घेण्याची पद्धत बंद झाली पाहिजे. द्राक्षपीक विमा सक्षम करावा. सक्तीची वीज तोडणी महावितरणने तातडीने थांबवावी, अन्यथा त्यांना आमचा इंगा दाखवू.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, सावकार मदनाईक, पोपट मोरे, संजय बेले, विठ्ठल मोरे, भरत चौगुले, बाबा सांद्रे, जगन्नाथ भोसले उपस्थित होते.
राजू शेट्टी म्हणाले, नागेवाडी कारखान्याचा आता लिलाव होणार आहे. या कारखान्यातील साखर ना. जयंत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घ्यावी, असे सांगितले आहे. ते म्हणतात "साखर तुम्ही घ्या, ती विकून पैसे कसे द्यायचे हे माझे मी बघेन."
संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, कोणताही शेतकरी खासदार संजय पाटील यांना सोडणार नाही. त्यांना वाटत असेल शेतकर्यांचे पैसे बुडवू; पण आम्ही त्यांच्याकडून पै न् पै वसूल करू. शेतकर्यांना देण्यासाठी पैसे नसतील तर त्यांनी त्यांचे घरदार विकावे, परंतु कष्टकरी शेतकर्यांचे पैसे द्यावे.
संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा म्हणाले, साखरसम्राटांचा तिरडीमोर्चा पोलिसांनी अडवून विनाकारण डिवचले आहे. वसगडे येथे 2012 मध्ये पोलिसांनी गोळीबार केला होता. त्याचा हिशेब अजून बाकी आहे. कारखाने, सूतगिरण्या, बँका बुडविणार्यांवर कारवाई करा. शेतकर्यांबरोबर कसले लढता?
हेही वाचलत का ?