तब्बल २ कोटींची लाच मागितली, १० लाख स्विकारताना पोलीस कर्मचारी ACB च्या जाळ्यात | पुढारी

तब्बल २ कोटींची लाच मागितली, १० लाख स्विकारताना पोलीस कर्मचारी ACB च्या जाळ्यात

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : ACB : व्हायरल झालेल्या मोबाईल संभाषणाच्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी परभणी जिल्ह्यातील सेलू विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याने एका व्यक्तीकडे तब्बल २ कोटींची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

लाचेचा १० लाखांचा पहिला हप्ता घेताना ACB विभागाने सेलू विभागाच्या उपविभागीय कार्यालयातील एका पोलिस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरू असल्याचे ACB ने सांगितले.

ACB ने दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांच्या मित्राचा मे महिन्यात अपघाती मृत्यू झाला होता. याप्रकरणी परभणीतील सेलू पोलिस ठाण्यात ०३ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाईलवरून संभाषण व्हायरल

तक्रारदार यांचे मृत मित्राच्या पत्नीसोबत मोबाईलवर झालेले एक संभाषण व्हायरल झाले.

हे संभाषण ऐकून सेलू विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल (५५) यांनी तक्रारदार यांना ०९ जुलै रोजी आपल्या कार्यालयात बोलावून घेतले.

तक्रारदार हे पाल यांच्याकडे गेले असता त्यांनी व्हायरल झालेल्या मोबाईल संभाषणाच्या प्रकरणातून बाहेर पडायचे असेल तर २ कोटी रुपये देण्याची मागणी केली.

पोलिस अधिकाऱ्याने एवढ्या मोठ्या रकमेची मागणी केल्याने तक्रारदार यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

पाल हे वारंवार फोन करुन त्याला पैशांसाठी धमकावू लागले. अखेर तक्रारदार यांनी २२ जुलैला एसीबीच्या मुंबईतील मुख्यालयात येऊन याबाबत तक्रार दिली.

एसीबीच्या मुंबई विभागाच्या पथकाने याची पडताळणी केली असता पाल हे तक्रारदार यांच्याकडे पैशांची मागणी करत असल्याचे उघड झाले.

पोलिस नाईकला रंगेहाथ ताब्यात

पुढे तक्रारदार यांनी पाल यांना कॉल करुन २ कोटींवर तडजोड करण्यास सांगितले.

यानंतर त्यांनी दिड कोटी रुपयांची मागणी केली. या लाचेच्या रकमेपैकी १० लाख रुपये लाच तक्रारदार यांच्या भावाकडून घेताना एसीबीच्या पथकाने शुक्रवारी सापळा रचून पाल याच्या कार्यालयातील पोलिस नाईक गणेश चव्हाण (३७) याला रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.

Back to top button