कोयना धरण : दरवाजे १२ फुटांवर; ५३,३६० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग | पुढारी

कोयना धरण : दरवाजे १२ फुटांवर; ५३,३६० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

पाटण : पुढारी वृत्तसेवा

कोयना धरणाचे दरवाजे १२ फुटांवर उचलण्यात आले आहेत. कोयना धरणांतर्गत विभागात सुरू असलेला विक्रमी पाऊस व त्याच पटीत होत असलेली विक्रमी पाण्याची आवक लक्षात घेता शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता धरणाचे सहा वक्री दरवाजे 10 फुटांवरून 12 फूट उचलण्यात आले आहेत.

या 6 वक्री दरवाजातून विनावापर 51,260 क्युसेक्स व कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2100 क्युसेक्स असे प्रतिसेकंद 53,360 क्युसेक्स पाणी सध्या पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी 84,878 क्युसेक्स इतक्या पाण्याची आवक होत आहे.

सध्याचा एकूण पाणीसाठा 85.66 टीएमसी इतका असून तुर्तास यापेक्षा अधिक पाणी सोडण्याच्या शक्यता कमी असल्याचे धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. धरणातून सोडण्यात आलेले महाकाय पाणी व पूर्वेकडे दमदार सुरू असलेला पाऊस यामुळे कोयनेसह अन्य छोट्या, मोठ्या नद्यांनी आपल्या धोक्याच्या पातळी ओलांडून नदीपात्रातील पाणी आजूबाजूच्या गावात, शेतात, बाजारपेठांत व दुकानात घुसल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

याबाबत प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाकडून आवश्यक प्रयत्न सुरू असले तरी त्याला निसर्गाची अपेक्षित साथ मिळत नसल्याने स्थानिक परिस्थिती काही ठिकाणी हाताबाहेर गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे .

कोयना धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. धरणाचे सहा वक्री दरवाजे 12 फुटांनी उचलण्यात आले आहेत. तूर्तास यापेक्षा जास्त पाणी सोडण्याचा विचार नाही. तथापि धरणात येणार्‍या पाण्याचे प्रमाण वाढले तरच अधिक पाणी सोडण्याचा विचार करण्यात येईल.
– नितीश पोतदार
कार्यकारी अभियंता, कोयना धरण

Back to top button