गडहिंग्लज : नलवडे साखर कारखान्यात फक्त तीन तासात प्रशासक नियुक्ती व स्थगितीचा खेळ ! | पुढारी

गडहिंग्लज : नलवडे साखर कारखान्यात फक्त तीन तासात प्रशासक नियुक्ती व स्थगितीचा खेळ !

गडहिंग्लज, पुढारी वृत्तसेवा : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) गेल्या दहा पंधरा दिवसांच्या घडामोडी रोजच वेगवेगळ्या घडत आहेत. शुक्रवारी सकाळी कारखान्यावर प्रशासक म्हणून सहकारी संस्थांचे विभागीय उपनिबंधक अरुण काकडे यांना प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी तर जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे व जिल्हा विशेष लेखापरिक्षक किरणसिंह पाटील यांना सदस्यपदी नियुक्त केले होते.

तसेच, यापूर्वीच कारखान्याचे संचालक अमर चव्हाण व संभाजी नाईक यांनी कारखान्यावर प्रशासक नेमू नये यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यामध्ये उच्च न्यायालयाने प्रशासक नेमण्यासाठी स्थगिती दिली असून अवघ्या तीन तासातच प्रशासकांची नियुक्ती व स्थगिती अशा दोन्ही बाबी घडल्याने कारखान्यातील राजकीय घडामोडी अधोरेखीत झाल्या आहेत.

दरम्‍यान, गोडसाखर कारखान्यात एकूण १८ संचालकांपैकी १२ संचालकांनी अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करीत राजीनामे दिले होते. यानंतर प्रादेशिक सहसंचालकांनी कारखाना प्रशासनाला प्रशासक मंडळ का नियुक्त करु नये आणि याबाबत खुलासा ही मागितला होता.

याप्रकरणी सहा संचालकांपैकी काहींनी म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितली होती, जेणेकरुन प्रशासक नियुक्ती काही कालावधीसाठी पुढे ढकलून न्यायालयीन पातळीवरुन यासाठी स्थगिती घेता येईल, असा अंदाज बांधला होता. हाच अंदाज खरा ठरला असून आजच्या घडीला प्रशासक नियुक्तीला स्थगिती मिळाल्याने त्या संचालकांनाकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

प्रशासकांनी सकाळी बैठक घेवून कारखान्याचे कामकाजही सुरू केले होते तोवर दुपारी स्थगिती आल्याने गोडसाखरमध्ये काट-शहाचे राजकारण किती वेगाने सुरू आहे याचा अंदाज येत आहे.

हे ही वाचलं का  

Back to top button