बुल्‍ली-सुल्‍ली ॲपचा राज्यसभेत मुद्दा उपस्‍थित | पुढारी

बुल्‍ली-सुल्‍ली ॲपचा राज्यसभेत मुद्दा उपस्‍थित

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्‍तसेवा : बुल्ली बाई आणि सुल्ली डील्स ॲपचा मुद्दा आज (शुक्रवार) राज्यसभेत उपस्थित करण्यात आला. भाजप खासदार सुशील मोदी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे ही आपली मूलभूत जबाबदारी असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. मग स्त्रिया कोणत्याही धर्माच्या किंवा प्रांताच्या असोत.

महिलांच्या सुरक्षिततेला आमचे प्राधान्य असल्याचे वैष्णव यांनी सांगितले. अशी कोणतीही माहिती मिळताच त्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी विरोधकांचाही समाचार घेत म्हटले की, सोशल मीडियावर सरकारकडून कोणतीही कारवाई केली जाते तेव्हा विरोधक प्रश्न उपस्थित करतात की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे, पण महिलांचे संरक्षण करायचे असेल तर नियमांचे पालन केले पाहिजे. कठोर करावे लागेल. समतोल साधावा लागेल.

माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सोशल मीडिया सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने 2021 मध्ये काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यानुसार 5 संस्थात्मक फ्रेमवर्क तयार करण्यात आले. एखादा मुद्दा समोर येताच तात्काळ कारवाई केली जाते. त्यांनी असेही सांगितले की प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने प्रत्येक महिन्याला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर अनुपालन अहवाल प्रकाशित केला पाहिजे. आमच्याकडून अहवाल मागितला जात नाही.

Back to top button