कोल्हापूर : मास्‍क-सॅनिटायझर साहित्‍य खरेदीच्‍या अमिषाने १ कोटींचा गंडा, पितापुत्रांसह चौघांविरोधात गुन्‍हा | पुढारी

कोल्हापूर : मास्‍क-सॅनिटायझर साहित्‍य खरेदीच्‍या अमिषाने १ कोटींचा गंडा, पितापुत्रांसह चौघांविरोधात गुन्‍हा

कोल्‍हापूर; पुढारी वृत्तसेवा : मास्‍क, सॅनिटायजर, फेसशिल्‍डसह कोरोना प्रतिबंधक साहित्‍य खरेदीतून फायदा मिळवून देण्‍याच्‍या अमिषाने १ कोटी ५ लाखांचा गंडा घातल्‍याचा प्रकार समोर आला आहे. मे २०२१ पासून हा प्रकार सुरु होता. याप्रकरणी रोहीत हरीष नागदेव, राहूल हरीष नागदेव, हरीष बलिराम नागदेव (तिघे रा. महालक्ष्‍मी पार्क, हॉकी स्‍टेडीयम चौक) या पितापुत्रांसह शाम पल्‍लोद या चौघांविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्‍हा दाखल झाला.

फिर्यादी संतोष मोहन पोवार (वय ४०, रा. दौलतनगर) यांचा वाहन खरेदी-विक्रीचा व्‍यवसाय आहे. शिरोली येथील त्‍यांच्‍या गॅरेजमध्‍ये नागदेव पितापुत्र वाहन खरेदीच्‍या बहाण्याने येत होते. या तिघांनी पोवार यांच्‍यासह त्‍यांच्‍या काही मित्रांना कोरोना काळात सॅनिटायजर, मास्‍क, हॅन्‍डग्‍लोज, पीपीई कीट, ऑक्‍सीमीटर, फेसशिल्‍ड या वस्‍तूंची ऑर्डर घेवून व्‍यवसायातून मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्‍याचे अमिष दाखवले. मे २०२१ पासून सुरुवातीला प्रत्‍येकी दीड लाख रुपये घेवून यातून फायदा मिळत असल्‍याचे भासवले.

कोरोना प्रतिबंधक साहित्‍य खरेदीतून फायदा मिळत असल्‍याचे पोवार यांच्‍यासह त्‍यांचे भागीदार जिलानी मुल्‍ला, समीर भालदार यांना पटवून देण्‍यात नागदेव पितापुत्र यशस्‍वी झाले. यानंतर त्‍यांनी तिघांकडून वेळोवेळी पैसे घेतले. ही रक्‍कम १ कोटी ५ लाख १५ हजारांच्‍या घरात गेली. मात्र, याची गुंतवणूक न करता हे पैसे नागदेव व पल्‍लोद फसवणूक करत असल्‍याचे लक्षात आल्‍याने पोवार यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली.

हे ही वाचलं का ?

Back to top button