Teddy bear : आबालवृद्धांना का आवडतात टेडी बियर? | पुढारी

Teddy bear : आबालवृद्धांना का आवडतात टेडी बियर?

वॉशिंग्टन : काही गोष्टी अशा असतात, ज्या सर्वच वयोगटातील लोकांना आवडतात. त्यामध्ये चॉकलेट बारपासून ते टेडी बियरसारख्या सॉफ्टटॉईजपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होतो. आता टेडी बियरसारखे खेळणे लहान मुलांना आवडते ते आपण समजू शकतो. पण अनेक प्रौढ व्यक्तींनाही टेडीची आवड का असते, असा प्रश्न आहे. फ्रान्सच्या संशोधकांनी यामागील कारण शोधले आहे. हे कारण भावनात्मक नात्याचे आहे.

फ्रान्सच्या एइक्स मार्सिले युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी या गोष्टीचा अभ्यास केला. त्यांचे मत आहे की, टेडी बियर केवळ त्यांच्या ‘क्यूट’ दिसण्यामुळे, स्माईलमुळे किंवा ते गुबगुबीत असतात म्हणूनच खास ठरत नाहीत. ते खास असतात, कारण आपले त्यांच्यासोबत भावनात्मक कनेक्शन असते. या संशोधनासाठी तीनशेपेक्षा अधिक प्रौढ लोकांचा सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये त्यांना टेडी बियर आणि अन्य खास वस्तूंच्या अनुभवाबाबत विचारण्यात आले. त्यांना आढळले की, टेडी बियर आवडण्यामागे भावनात्मक जिव्हाळा आहे.

ते एका खेळण्यापेक्षा अधिक काही तरी होते. ते तुम्हाला इतिहासाशी, जुन्या दिवसांशी जोडते. माणसाच्या भावनात्मक विकासात ते एक मोठी भूमिका बजावतात. लहानपणी आपण त्यांच्याजवळ आपल्या भावना व्यक्त करू शकत होतो, असे अनेकांना वाटते. अनेक प्रौढ लोकांकडे आजही बालपणीचे टेडी आहेत. ते केवळ जुनी आठवण म्हणून नाही तर आताही भावनात्मक सुरक्षा देतात. शिवाय टेडीच्या स्पर्शाने ऑक्सोटिन हार्मोन निघतात. ते जवळ असले की झोपही चांगली लागते, असे अनेकांना वाटते!

Back to top button