मलेरियाचा संक्रमण पॅटर्न बदलण्यामागे हवामान बदल | पुढारी

मलेरियाचा संक्रमण पॅटर्न बदलण्यामागे हवामान बदल

बडोदा : संशोधकांनी म्हटले आहे की, मलेरियाचा संक्रमण पॅटर्न बदलण्यासाठी हवामान बदल महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. मलेरियाचा फैलाव हा डासांमुळे होतो. 2022 मध्ये मलेरियामुळे जगभरात सुमारे 6,08,000 लोकांचा मृत्यू झाला आणि 249 दशलक्ष नवी प्रकरणे समोर आली.

मलेरियावर 2022 च्या ‘लान्सेट’ने केलेल्या संशोधनानुसार, तापमानातील वृद्धीमुळे मलेरियाचा परजीवी वेगाने विकसित होऊ शकतो. त्यामुळे मलेरियाच्या संक्रमणामध्ये वाढ होऊ शकते. केवळ 2 ते 3 अंश सेल्सिअसच्या वाढीनेही या आजाराच्या विळख्यात अडकणार्‍या लोकांमध्ये 5 टक्क्यांची वाढ होऊ शकते. ही वाढ 700 दशलक्षपेक्षा अधिक लोकांइतकी आहे.

बडोदाच्या डॉ. मनीष मित्तल यांनी सांगितले की, विशेषतः जून ते नोव्हेंबरपर्यंत मान्सून आणि प्री-मान्सून सीझनवेळी हवामान बदल मलेरियाच्या ट्रान्समिशनचा म्हणजेच संक्रमणाचा पॅटर्न बदलण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. पावसामुळे पाणी साचते आणि मलेरियाचे परजीवी वाहून नेणार्‍या अनाफेलिस डासांच्या माद्यांना प्रजननासाठी ठिकाण मिळते. अशावेळी डासांची संख्या वाढल्याने मलेरियाचा धोकाही अधिक वाढतो. मलेरियाचा प्रभाव कमी करण्यासाठी लवकर निदान आणि उपचार गरजेचे आहेत. त्यासाठी लोकांमध्ये जागृतीही आवश्यक आहे. तापाच्या लक्षणांबाबत गंभीर होणे व रक्ताची चाचणी करणे गरजेचे ठरते.

Back to top button